स्वच्छतागृहात न्यावे लागते, म्हणून पलंगाला बांधून वृद्धेला मारहाण; महिला केअरटेकर विरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:53 IST2026-03-24T11:53:30+5:302026-03-24T11:53:30+5:30
या प्रकरणी विशाली यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी केअरटेकरच्या विरोधात गुन्हा नोंदविला.

स्वच्छतागृहात न्यावे लागते, म्हणून पलंगाला बांधून वृद्धेला मारहाण; महिला केअरटेकर विरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वारंवार स्वच्छतागृहात न्यावे लागते, म्हणून संतापलेल्या केअरटेकरने वृद्धेला पलंगाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना बोरीवली पश्चिममध्ये उघडकीस आली आहे. सुरेखा पवार(३०) असे या केअरटेकरचे नाव असून, वैशाली अजवेलकर (७५) असे मारहाण झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विशाली यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी केअरटेकरच्या विरोधात गुन्हा नोंदविला.
११ मार्च रोजी साई सीनियर केअर फाउंडेशनमध्ये हा प्रकार घडला. याबाबत कुणाला सांगितले, तर पुन्हा मारहाण करीन, अशी धमकी केअरटेकर सुरेखाने वैशाली यांना दिली होती. तक्रारदार वैशाली अजवेलकर या सेवानिवृत्त आहेत. त्यांचे पती २६ वर्षांपूर्वी वारले असून, त्यांना एका मुलीसह तीन मुले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्या गोराई २ येथील साई सिनियर केअर फाउंडेशनमध्ये राहत आहेत. ११ मार्च रोजी दुपारी अजवेलकर यांना वारंवार लघवीला जावे लागत होते.
...असा झाला उलगडा
वारंवार शौचालयात न्यावे लागत असल्याने, सुरेखा भडकली मदत करण्यास नकार दिला, असा वैशाली यांचा आरोप आहे. २० मार्चला एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथकाने काळजीगृहाला भेट दिली.
त्यांनी अजवेलकर यांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर, त्यांनी अत्याचाराची कहाणी सांगितली. त्यानंतर, बोरीवली पोलिसांनी सुरेखाच्या विरोधात एफआयआर नोंदवून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.