उबर कॅब अपघातात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; बोरीवली येथे डिव्हायडरला धडक; चालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:19 IST2025-12-24T12:18:45+5:302025-12-24T12:19:00+5:30
चालकाने वाहन बेदरकारपणे, भरधाव व निष्काळजीने चालविल्यामुळे वाहन डिव्हायडरला धडकले आणि त्यामुळे जेसिंथा यांचा मृत्यू झाला.

उबर कॅब अपघातात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; बोरीवली येथे डिव्हायडरला धडक; चालकावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उबर कॅबच्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबरला घडली आहे. जेसिंथा डिसुजा (६६) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी उबेर कॅब चालकाविरोधात कस्तुरबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
मुलगा एडवर्ड प्रियांक डिसुजा (३७) याने आई जेसिंथा यांना वसई येथून वडाळा येथे येण्यासाठी कॅब बुक करून दिली होती. ही कॅब सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास वसईहून निघाली. ९ वाजण्याच्या सुमारास सुनील पाल याने संबंधित कॅबचालकाने बोरीवली पूर्व येथे रस्त्याच्या डिव्हायडरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जेसिंथा या गंभीर जखमी झाल्याचे आणि त्यांना समतानगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. एडवर्ड यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. जेसिंथा यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते.
डोक्याला गंभीर दुखापत
जेसिंथा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एडवर्ड हे वडाळा येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असून, ते ईस्टर्न शिपिंग कंपनीत नोकरी करतात. त्यांचे आई-वडील वसई येथे राहत होते.
निष्काळजीपणे चालवली कार
चालकाने वाहन बेदरकारपणे, भरधाव व निष्काळजीने चालविल्यामुळे वाहन डिव्हायडरला धडकले आणि त्यामुळे जेसिंथा यांचा मृत्यू झाला.
चालकाविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.