"तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले"; मुलाचं बोलणं ऐकून हादरली आई, विषारी औषध घेऊन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:31 IST2025-05-30T12:24:04+5:302025-05-30T12:31:19+5:30
विषप्राशन करत वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न

"तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले"; मुलाचं बोलणं ऐकून हादरली आई, विषारी औषध घेऊन...
मुंबई : मुलाच्या वारंवार ओरडण्याला कंटाळून ७८ वर्षीय महिलेने गोरेगाव येथील घरी उंदीर मारण्याचे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गोरेगाव पोलिसांनी तिच्या मुलाविरुद्ध पालक कल्याण आणि ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
पीडित महिला गोरेगाव येथे ९१ वर्षीय पती, ५७ वर्षीय अविवाहित मुलगी, ५९ वर्षीय मुलगा, त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुले यांच्यासह राहते, तर ५० वर्षीय दुसरा मुलगा त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. पीडित महिला शेंगदाण्याच्या कारखान्यात पॅकेजिंग यूनिटमध्ये काम करते. ती आणि तिची मुलगी घरात दोघेच कमवते आहेत. मोठा मुलगा बेरोजगार आणि मद्यपी आहे. तो आई-वडिलांशी किरकोळ कारणांवरून अनेकदा भांडत असतो.
२३ मे रोजी सकाळी भांडण झाले असता मोठ्या मुलाने 'तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले,' अशी ओरड करत आईला शिवीगाळ केली. यामुळे ती हादरली. काही वेळाने ती कामावर गेली. तिने तिथे मालकाकडून ५०० रुपये उसने घेतले. तसेच घरी पाहुणे आल्याच्या बहाण्याने एक दिवसाची सुटी मागितली. मात्र, तिने या पैशांतून उंदीर मारण्याचे विष खरेदी केले.
मुलीने केले रुग्णालयात दाखल
२५ मे रोजी तिची मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर असताना तिने ते विष पाण्यात मिसळून प्राशन केले. त्यामुळे तिला उलट्या होऊ लागल्या. मुलगी घरी परतल्यावर तिने आईला खासगी रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी तिच्या मोठ्या मुलाविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
दुसऱ्या घटनेत वृद्धाला मारहाण
दहिसर येथील ७३ वर्षीय वृद्धालाही फ्लॅटसाठी त्यांच्या मुलाने लाकडाच्या पट्टीने मारहाण करत त्यांचे पाय फॅक्चर केल्याची घटना २५ मे रोजी घडली होती.