अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रनमध्ये वृद्ध जखमी; सीसीटीव्ही व्हायरल, पवईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 20:15 IST2023-09-14T20:14:31+5:302023-09-14T20:15:33+5:30
वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार गेटच्या डावीकडे वळण घेत असताना हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.

अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रनमध्ये वृद्ध जखमी; सीसीटीव्ही व्हायरल, पवईतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भरधाव वेगाने निघालेल्या अल्पवयीन मुलाचा कारच्या धडकेत वृद्ध जखमी झाल्याची घटना पवईत घडली. या अपघाताचे सीसीटीव्ही गुरुवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहे.
चांदिवलीच्या नाहर अम्रित शक्ती रोड येथील एका कॉलनीच्या गेटवर हा अपघात घडला. सकाळच्या सुमारास वृद्ध गेट समोरून रोडकडे चालत असताना, पाठीमागून आलेल्या कारने रिक्षाला धडक देत वृद्धाला काही अंतरावर फरफटत नेले. या अपघातानंतर मुलगा तेथून पुढे निघून गेला.
वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार गेटच्या डावीकडे वळण घेत असताना हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. घटनेची वर्दी लागताच पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. मुलाच्या कुटुंबियानाही धक्का बसला आहे. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी असून त्यांना तीन महिने सक्तीचा आराम घेण्यास सांगितले आहे. मुलाला ५ हजाराच्या दंडावर सोडून देण्यात आले आहे. वृद्धाने तक्रार दिली असून, याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहे.
ही घटना ६ तारखेची असून, मुलगा अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गाडी वडिलांकडून घेऊन गेला असल्याचे समोर येताच वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. याबाबतचा अहवाल बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात येत असल्याचे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांनी दिली आहे.