Eknath Shinde: फडणवीसांनी आम्हाला मदत केली तर चुकीचं काय?, केसरकर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:52 PM2022-06-28T12:52:45+5:302022-06-28T12:57:33+5:30

देवेद्र फडणवीस हे आज दिल्लीसाठी रवाना होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसरकर यांना एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलताना आपली भूमिका मांडली.

Eknath Shinde: What is wrong if Fadnavis helped us, Kesarkar spoke clearly for the first time | Eknath Shinde: फडणवीसांनी आम्हाला मदत केली तर चुकीचं काय?, केसरकर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

Eknath Shinde: फडणवीसांनी आम्हाला मदत केली तर चुकीचं काय?, केसरकर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

Next

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटाला भाजप नेत्यांची फूस असल्याचा आरोप शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत आहेत. मात्र, शिंदे गटाकडून अद्यापही याबाबत स्षष्टपणे सांगण्यात आले नाही. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे गटाला राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचाच पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. तर, संजय राऊत हे थेटपणे भाजपवर आरोप करत आहेत. मात्र, भाजपनेही अद्याप याबाबत स्पष्टता दिली नाही. आता, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी फडणवीसांच्या भूमिकेबाबत स्पष्टता केली आहे. 

देवेद्र फडणवीस हे आज दिल्लीसाठी रवाना होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसरकर यांना एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलताना आपली भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध मित्रत्त्वाचे आहेत. मी रात्री 12 वाजताही देवेंद्र फडणवीसांना फोन केला तरी ते माझा फोन घेतात. केवळ भाजपचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाहीत. तर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही अतिशय चांगले आहेत, असे म्हणत आम्ही फडणवीस यांची मदत घेतली तर चुकीचं काय, असा थेट सवाल केसरकर यांनी विचारला आहे.  

तेव्हा मुंबईतही हॉटेलमध्येच राहिलो

गुवाहाटीतील आमच्या हॉटेलचा खर्च कोण करतं, या प्रश्नावरुनही त्यांनी भूमिका मांडली. तसेच आम्ही आमदार आहोत, आम्हाला चांगल्या पगारी आहेत. मग आमचा राहण्याचा खर्च आम्ही करू शकत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसेच, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठीही आम्ही मुंबईतील फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहत होतो. त्यावेळी, आमच्या राहण्याचा, या हॉटेलिंगचा खर्च कोणी केला, याबाबत कुणीही प्रश्न विचारला नाही, असेही ते म्हणाले. त्यावेळी, पक्षप्रमुखांना आम्हाला तेथे राहायला सांगितलं होतं, येथे आमच्या गटनेत्यांच्या आदेशावरुन आम्ही येथे राहात आहोत, असेही केसरकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्रवापसीबद्दल राऊतांना विचारा

आमच्या महाराष्ट्रावापसीबद्दलचा प्रश्न संजय राऊतांना विचारा. त्यांनीच लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. त्यामुळेच, आम्ही महाराष्ट्रात येत नाही. तसेच, तुमच्याकडे संख्याबळ नसतानाही कशाला सांगता, 21 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 51 आमदार तुमच्यापासून दूर गेलेत हे कबुल करा, अशा शब्दात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना सुनावले. 

राज्यपालांनी स्वत:हून अविश्वासदर्शक ठराव आणावा

"आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं नाही. महाविकास आघाडीनं आपली नाटकं आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा", असं विधान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी केलं आहे. तसंच अविश्वासदर्शक ठरावाबाबत बोलत असताना त्यांनी याबाबत आता थेट राज्यपालांनीच निर्णय घ्यावा असंही साकडं घातलं आहे. "राज्यपालांनी आता सरकारनं तीन दिवसात काढलेल्या जीआरची माहिती मागवली आहे. त्याचप्रमाणे ते आता सुप्रीम कोर्टात आमच्या याचिकेची दखल घेतील आणि स्वत:हून अविश्वास दर्शक ठराव आणावा, अशी मागणी दिपक केसरकर यांनी केली आहे. 

Web Title: Eknath Shinde: What is wrong if Fadnavis helped us, Kesarkar spoke clearly for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.