ठाणे - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षात पडलेली फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला बंडखोर आमदारांना आणि नंतर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना भावूक आवाहन केले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी इमोशनल कार्ड खेळल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनीही इमोशनल कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून माझं काय चुकलं या शिर्षकाखाली मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
माझं काय चुकलं या शिर्षकाखाली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेले सवाल पुढील प्रमाणे आहेत.- ४० वर्ष दिवस-रात्र कुटुंबाची पर्वा न करता तुमच्या चरणी वाहिली.... - माझं काय चुकलं? - माझ्या खात्याच्या बदल्या करताना, निर्णय घेताना मला डावललं गेलं, तरीही मी गप्प राहिलो - माझं काय चुकलं? - आपल्या लेखांमधून आणि टीव्हीवर एक व्यक्ती रोज पक्षाबद्दल तिरस्कार वाढवतेय, याबद्दल पक्षाला सावध केले - माझं काय चुकलं? - कोरोनाच्या काळात पीपीई किट घालून रुग्णांसाठी शक्य होईल तितकी मदत करत राहिलो आणि शिवसेनेची शिकवण जपत राहिलो - माझं काय चुकलं?- शिवसंपर्क अभियानात समोर झालेली पक्षाची वाताहत तुमच्यापर्यंत पोहोचवली - माझं काय चुकलं?