Join us

"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 22:18 IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava : "जिथे संकट, तिथे एकनाथ शिंदे मदतीला धावून जाईल..."

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava : महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा या सणाला महत्त्व आहे. कारण या दिवशी ठिकठिकाणी विविध पक्षांचे आणि संघटनांचे मेळावे होतात. मुंबईत शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा झाला. तर दुसरीकडे गोरेगावला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना, पूरग्रस्तांना मदत देण्याबाबतचे महत्त्वाचे विधान केले. पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी त्यांना मदत दिली जाईल हा माझा शब्द आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही तोफ डागली.

व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा...

"ज्या ज्या वेळी लोकांवर संकट आले, तेव्हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर पहलगाममध्ये आणि अगदी नेपाळमध्येही आपल्या शिवसेनेचे लोक मदतीसाठी पोहोचले होते. अडकलेल्या लोकांना सुखरूप इकडे आणण्याचे काम शिवसैनिकांनी केले. ही आपली जबाबदारी आहे. कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा असा एकनाथ शिंदे नाही. आणि वर्क फ्रॉम होम किंवा फेसबुक लाईव्ह करणारा तर एकनाथ शिंदे नाहीच नाही," अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.

तुम्ही साधा बिस्कीटचा पुडा तरी दिला का?

"बाळासाहेब ठाकरे सांगायचे की कार्यकर्ता हा घरात नव्हे तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आम्ही तेच करतो. यावेळीही आम्ही मदतीचे किट घेऊन पूरग्रस्तांना दिलासा द्यायला गेलो होतो. तुम्ही (उद्धव ठाकरे) नुसते गेलात. तिथल्या लोकांना तुम्ही साधा बिस्किटचा पुडा तरी दिलात का? आता म्हणतात की माझ्या हातात काही नाही, सत्ता नाही... जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हाही तुम्ही काहीच दिले नाहीत. कारण लोकांना देण्यासाठी दानत लागते. ती दानत आमच्याकडे आहे, तुम्ही काहीही देऊ शकत नाही. कारण तुम्ही कायम 'लेना' बँक असता, आम्ही 'देना' बँक आहेत. आम्ही कायम अडचणीत असलेल्यांना मदत देत असतो," असेही एकनाथ शिंदे यांनी सुनावले.

जिथे संकट, तिथे एकनाथ शिंदे पाठीशी असेल...

"बळीराजाच्या घरांची पडझड झाली आहे. मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आणि त्यांना मदतीचा हात दिला. महापूरात बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पण सरकार त्यांच्या पाठिशी आहे. बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे,80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण..हा गुरुमंत्र, मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दिलाय. आपण एक व्रत कधीही सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. जिथे संकट तिथे शिवसेना..जिथे आपत्ती तिथे शिवसेना..जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे मदतीला पाठीशी असेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde Slams Uddhav Thackeray Over Disaster Relief Inaction

Web Summary : Eknath Shinde criticized Uddhav Thackeray for neglecting flood victims, contrasting his hands-on approach with Thackeray's alleged reliance on vanity vans and remote work. Shinde pledged immediate assistance to those affected, emphasizing his commitment to serving the people directly, unlike his predecessor.
टॅग्स :एकनाथ शिंदेदसराउद्धव ठाकरेशिवसेनापूर