Join us

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:49 IST

पदाधिकारी निवडीवरून काही ठिकाणी असंतोष पसरला आहे. त्यातच १५ माजी नगरसेवक पक्षात नाराज असून ते ठाकरे गटात परतण्याची चर्चा होत आहे.

मुंबई - येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. त्यात मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: पक्ष संघटनेतील सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिंदेसेनेची तयारी सुरू आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेसेनेला धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेसेनेत गेलेले १५ माजी नगरसेवक नाराज असून ते उद्धवसेनेत परततील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

अलीकडेच शिंदेसेनेकडून मुंबईत प्रभारी विभाग प्रमुख ,विधानसभा प्रमुख पदांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. मात्र या पदाधिकारी निवडीवरून काही ठिकाणी असंतोष पसरला आहे. त्यातच १५ माजी नगरसेवक पक्षात नाराज असून ते ठाकरे गटात परतण्याची चर्चा होत आहे. या माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी ठाकरे गटाकडूनही हालचाली सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आमदार, खासदारांची बैठक घेतली. त्यात माजी नगरसेवकांच्या घरवापसीवरही चर्चा झाली. परंतु या सर्व अफवा असून ज्या नगरसेवकांबाबत गैरसमज पसरवले जात आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हे सर्व नगरसेवक खंबीरपणे पक्षातच असून येणारी निवडणूक दणदणीत मताधिक्याने जिंकू असा शब्द त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं शिंदेसेनेकडून सांगण्यात येते. 

दीड तास घेतली बैठक 

मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी सर्व आमदार, पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती यावर चर्चा झाली. मुंबईत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने आमदारांना दिली आहे. त्याशिवाय अलीकडेच मुंबईबाबत शिंदेसेनेकडून २१ जणांची जम्बो कमिटी स्थापन केली आहे.

अशी आहे शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती 

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते२) रामदास कदम, नेते ३) गजानन कीर्तीकर, नेते४) आनंदराव अडसूळ, नेते ५) मीनाताई कांबळे, नेत्या ६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार ७) रवींद्र वायकर, खासदार ८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार ९) राहुल शेवाळे, माजी खासदार १०) संजय निरुपम, माजी खासदार ११) प्रकाश सुर्वे, आमदार१२) अशोक पाटील, आमदार१३) मुरजी पटेल, आमदार १४) दिलीप लांडे, आमदार१५) तुकाराम काते, आमदार १६) मंगेश कुडाळकर, आमदार १७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार१८) सदा सरवणकर, माजी आमदार १९) यामिनी जाधव, माजी आमदार२०) दीपक सावंत, माजी आमदार २१) शिशिर शिंदे, माजी आमदार 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे