परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:20 IST2025-11-14T16:54:58+5:302025-11-14T17:20:15+5:30
जेव्हा गुप्ता यांनी बागुल यांच्याकडे पैशाची विचारणा केली, तेव्हा त्यांनी एक जुना चेक दिला, तो बाऊन्स झाला. त्यानंतर पुन्हा आणखी २ चेक दिले मात्र तेदेखील बाऊन्स झाले.

परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत चक्क महापालिकेचा फुटपाथ विक्री केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. मुलुंडमधील एका परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला शिंदेसेनेच्या नेत्याने ३ लाखात फुटपाथ विकला आहे. ही घटना २ वर्ष जुनी असून सध्या ती चर्चेत आली आहे.
मुलुंडमध्ये फुटपाथवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष गुप्ता यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्थानिक नेते अविनाश बागुल यांच्यावर आरोप केला आहे. २०२३ साली बागुल यांनी फुटपाथवरील एक हिस्सा ३ लाखात आपल्याला विकल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे. या व्यवहारासाठी ५० हजार रोकड आणि उर्वरित अडीच लाखाची रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून बागुल यांच्या बँक खात्यात देण्यात आली. मागील २ वर्षापासून जमीन व्यवहाराचे कागदपत्र बनवण्यासाठी गुप्ता मागे लागले होते. मात्र ना त्यांना जागा मिळाली, ना दिलेले पैसे परत मिळाले. २ वर्षांनी गुप्ता यांना ज्या जागेचा सौदा आपण केलाय, ती मुंबई महापालिकेची संपत्ती असल्याचं कळले. त्यानंतर हे प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई मिररने हे वृत्त प्रसारित केले आहे.
जेव्हा गुप्ता यांनी बागुल यांच्याकडे पैशाची विचारणा केली, तेव्हा त्यांनी एक जुना चेक दिला, तो बाऊन्स झाला. त्यानंतर पुन्हा आणखी २ चेक दिले मात्र तेदेखील बाऊन्स झाले. इतकेच नाही तर एका डोसावाल्याकडून दर महिना १७ हजार रूपये वसुलीही हा नेता करत असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला. गुप्ता यांनी जागेसाठी बागुल यांना ३ लाख रुपये दिले होते, त्यातील काही रक्कम बँकेतून कर्ज काढून आणली होती तर काही रक्कम आईचे दागिने गहाण ठेवून आणल्याचं त्यांनी सांगितले. या घटनेबाबत गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर बागुल यांनी दीड लाखाचा चेक दिला होता. मात्र ज्या बँकेचा चेक दिला, त्यात इतकी रक्कमच नव्हती त्यामुळे हा चेक बाऊन्स झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुप्ता यांना कोर्टातून आदेश आणण्यास सांगितले आहे.

शिंदेसेनेच्या नेत्याने फेटाळले आरोप
या संपूर्ण प्रकरणावर शिंदेसेनेचे नेते अविनाश बागुल यांनी गुप्ता यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुप्ता आणि माझ्यात कुठलाही करार झाला नव्हता. त्याने माझ्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते, जी मी त्याला परत केले. माझ्यावरील आरोप राजकीय षडयंत्र आहे असं बागुल यांनी म्हटलं.