Join us

Eknath Shinde: सुरक्षेचा ताफा बाजूला सारत मुख्यमंत्री 'बस'मध्ये, गोव्यातील आमदार मुंबईला निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 18:17 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या 'अग्रदूत' बंगल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते

मुंबई - राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व खात्यांच्या रितसर बैठका शिंदे आणि फडणवीसांकडून घेतल्या जात आहेत. तर, दुसरीकडे आपल्यासोबत बंडखोरी केलेल्या 50 आमदारांच्याही संपर्कात एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळेच, ते 50 आमदारांना मुंबईला आणण्यासाठी स्वत: गोव्याला गेले आहेत. एकनाथ शिंदेंचा आमदारांसमवेत बसमधील एक व्हिडिओ समोर आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या 'अग्रदूत' बंगल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास सव्वातास चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीसाठी भाजपा नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीनंतर ते गोव्यात थांबलेल्या बंडखोर आमदारांसोबत शिंदे चर्चा करुन त्यांना मुंबईला आणण्यासाठी गेले होते. आता, आमदारांना सोबत घेऊन ते स्वत: येत आहेत. 

गोव्यातील हॉटेलमधून गोवा विमानतळावर येण्यासाठी सर्व आमदारांना एक बस केली होती. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसल्याचं पाहायला मिळालं. शिंदे यांच्याशेजारी भाजप नेते रविंद्र चव्हाण हेही होते. आपली सुरक्षा आणि मुख्यमंत्र्यांचा फौजफाटा सोडून एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसोबत बसमध्ये दिसून आले. तेथून ते विमानाने मुंबईला येणार आहेत. आज मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त उपस्थितीत या आमदारांसमवेत बैठक होणार आहे. त्यामुळे, मोठा फौजफाटा मुंबईत आला आहे. 

दरम्यान, रविवारी राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याच्या स्ट्रॅटजीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय खातेवाटपासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाआमदारगोवा