"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:51 IST2025-11-03T18:50:03+5:302025-11-03T18:51:13+5:30
अलीकडेच प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय आणि आमचे नाते जवळचे आहे. त्यांच्यामुळेच मी ३ वेळा आमदार झालो असंही त्यांनी म्हटलं होते.

"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
मुंबई - शिंदेसेनेचे मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. मराठी माझी आई तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं विधान सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात केले आहे. शिंदेसेनेच्या आमदाराच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की, मराठी माझी आई आणि उत्तर भारत मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. कारण आईपेक्षा जास्त प्रेम मावशी करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिले आहे. हेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांनाही द्या असं विधान त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय समाज जमलेला होता. त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या या विधानावर टाळ्यांचा गडगडाट केला. अलीकडेच प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय आणि आमचे नाते जवळचे आहे. त्यांच्यामुळेच मी ३ वेळा आमदार झालो असंही त्यांनी म्हटलं होते.
तर २०२२ मध्येच या लोकांनी आईला म्हणजेच मूळ शिवसेनेला रामराम केलेला आहे. त्यामुळे आई मेली तरी चालेल असं बोलणारा मुलगा न झालेला बरा. एका आमदारकीसाठी माझ्या गर्भातून ज्याला वाढवले त्याचा तो अपमान करतोय असं त्यांच्या आईला वाटत असेल. मतांसाठी किती लाचारी करणार आहात, ही जमात कुठल्याही स्थराला जाऊ शकते अशा शब्दात माजी महापौर आणि उद्धवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुर्वे यांच्या विधानाचा समाचार घेतला.
प्रकाश सुर्वे यांनी दिले स्पष्टीकरण
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या विधानानंतर प्रकाश सुर्वे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. आई देवाचे रूप असते, आई शेवटी आई होती. माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता, मात्र विरोधक त्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत. आई नसते तेव्हा मावशी आपल्यावर प्रेम करते हा माझ्या बोलण्याचा हेतू होता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा सुर्वे यांनी केला.