Join us

महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिंदेसेना आग्रही; भाजपचे अद्याप काहीच ठरेना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:41 IST

शिंदेसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांचीही नुकतीच बैठक झाली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र लढवली पाहिजे. विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना फायदा झाला, त्याप्रमाणे पालिका निवडणुकीतही सर्वच पक्षांचे बळ वाढेल, असा विश्वास शिंदेसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आपली ताकद वाढली असल्याचे मानून भाजप कोणत्याही निर्णयाप्रत येत नाही. त्यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता वाढली आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेने बैठका सुरु केल्या आहेत. तर शिंदेसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांचीही नुकतीच बैठक झाली. मुंबईतील मतदारांचा विधानसभेत मिळालेला प्रतिसाद पाहता, पालिका निवडणूकही महायुती म्हणून एकत्र लढवावी, अशी अपेक्षा शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  मात्र, शिंदेसेनेला भाजपकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. 

विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीने राबविलेल्या लोकोपयोगी योजना, गोरगरीब जनतेशी शिंदे यांचा सुसंवाद आणि अडीच वर्षांतील विकासकामांवर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले होते. त्यामुळे पालिका निवडणूकही महायुतीने सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन लढविली तरच पालिकेवर भगवा फडकवता येईल. - अरुण सावंत, प्रवक्ता, शिंदेसेना

मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने आमची प्रभाग स्तरावर तयारी सुरू आहे. सर्व प्रभागांत कार्यकर्त्यांची बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीतील युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जातो. त्या त्या वेळची परिस्थिती आणि ताकद पाहून असे निर्णय होतात. त्यामुळे सध्या याबाबतीत कोणताही निर्णय घेण्याची ही वेळ नाही. - केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता, भाजप

टॅग्स :निवडणूक 2024मुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदेशिवसेनाभाजपा