Join us
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: विस्तार लांबला, आमदारांमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली शिंदेगटाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 08:39 IST

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी अचानक अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, त्यांच्या सर्वच प्रशासकीय बैठका आणि पूर्वनियोजित दौरेही रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दौऱ्यावर दौरे सुरू असून दिल्लीवारी, महाराष्ट्रात मेळावे आणि पूरग्रस्त भागांची पाहणी सुरूच होती. त्यातूनच ताण आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. मात्र, आता प्रकृती अस्वस्थता असतानाही आज ते शिंदे गटातील 50 आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.  

एकनाथ शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते. पण या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांनी नंदनवन या शासकीय बंगल्यावर आराम केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दुपारीच दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. भाजपमध्ये काही ज्येष्ठांना बाजूला ठेवून नव्यांना संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. फडणवीस यांनी जुने-नवीन यांचे संतुलन ठेवा, असा आग्रह धरल्याची माहिती आहे. 

राज्यात ३५ दिवसांपासून अडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आजही निघाला नाही. मात्र, फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली बैठकीत भाजपची नावे अंतिम झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून अधिकची मंत्रिपदे आणि विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची आणि विस्तार लांबणीवर पडण्याचे तेही एक महत्त्वाचे कारण असल्याचीही माहिती आहे. फडणवीस हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटले तेव्हा यासंदर्भात तिथूनच दूरध्वनीवर शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आमदारांमध्ये अस्वस्थता

लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी ६ वाजता नंदनवन या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत आमदारांना संयम ठेवण्याचा सल्ला आणि त्यांच्या मनातील संभ्रम एकनाथ शिंदे यांच्याकडून दूर केला जाईल, अशी माहिती आहे. 

विस्तार आणखी लांबणीवर

दरम्यान, उद्या म्हणजेच ६ तारखेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे, मंत्रीमंडळ विस्तार आता सोमवार किंवा मंगळवारीच होईल, असे दिसून येते. कारण, ८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय पेचावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता ८ ऑगस्टनंतरच विस्तार केला जाईल, अशी शक्यता आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनादेवेंद्र फडणवीसभाजपा