Eknath Shinde Announces Priority to Virar-Alibaug Multimodal Corridor | विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरला अग्रक्रम, एकनाथ शिंदे यांची घोषणा
विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरला अग्रक्रम, एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई - एमएमआर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विरार–अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरचे काम राज्य सरकार प्राधान्याने हाती घेणार असल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील वाहतूककोंडी फोडण्याबरोबरच या संपूर्ण प्रदेशातील आर्थिक विकासाला हातभार लावणारा हा प्रकल्प असल्यामुळे त्याला अग्रक्रम देण्याचे निर्देश शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले आहेत.

एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात घेतली. याप्रसंगी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील मेट्रो प्रकल्प, शिवडी–न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार, अफोर्डेबल हाउसिंग अशा विविध प्रकल्पांचा आढावा यावेळी शिंदे यांनी घेतला.

विरार–अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरसाठी १०४ पैकी ५५ गावांमध्ये जॉइंट मेजरमेंट सर्व्हेचे काम पूर्ण झाले असून समद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्पबाधितांना मोबदला देण्यात येणार आहे. हा प्रकल्प एमएमआर प्रदेशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे फास्ट ट्रॅकवर याची अमलबजावणी करण्याचे निर्देश शिंदे यांनी आर. ए. राजीव यांना दिले.

मेट्रो प्रकल्पांची पूर्तता वेळेआधी करा!

मुंबईत एमएमआरडीएच्या माध्यमातून १२ मेट्रो मार्गांचे नियोजन असून त्यापैकी सहा मार्गिकांची कामे प्रत्यक्षात सुरू आहेत. अखेरच्या मार्गिकेचे काम २०२६ मध्ये पूर्ण होण्याचे नियोजन आहे. परंतु, या कामांना गती देऊन वेळापत्रकापूर्वी पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. विशेषत: मार्ग क्र. ८ हा मुंबई व नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणारा मार्ग २०२६ च्या आधीच पूर्ण होणे गरजेचे आहे. नवी मुंबई येथील विमानतळाचे काम त्याच्या बऱ्याच आधी पूर्ण होणार आहे. त्यामुळे या मार्गिकेचे काम २०२६ च्या आधी पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्याची सूचना शिंदे यांनी केली.

ठाणे–कल्याण, कल्याण–तळोजा मार्गात बदलाची चाचपणी

ठाणे–भिवंडी-कल्याण आणि कल्याण–डोंबिवली–तळोजा या दोन मेट्रो प्रकल्पांच्या बाबतीत आरेखनांसंदर्भात (अलाइनमेंट) अनेक तक्रारी आहेत. भिवंडी-कल्याण टप्प्यात अलाइनमेंट बदलण्याची मागणी होत आहे. तसेच, कल्याण–डोंबिवली–तळोजा मेट्रोचा मार्ग शीळ–कल्याण मार्गे न नेता विरळ लोकवस्ती असलेल्या गावांमधून नेल्याच्याही तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेऊन या दोन मार्गांची अलाइनमेंट बदलण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

फ्री वे चा मुलुंड-गायमुखपर्यंत विस्तार

ईस्टर्न फ्री वे सध्या मानखुर्द येथे येऊन संपतो, परंतु त्यापुढे मुलुंड–ठाण्याच्या दिशेने मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा फ्री वे मुलुंडपर्यंत आणि दक्षिणेला जीपीओ पर्यंत वाढवण्यासंदर्भात पावले उचलण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. ठाण्यातून जाणारा महामार्ग, तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी साकेत-गायमुख कोस्टल रस्त्याचे नियोजन असून हा रस्ता एमएमआरडीएने करावा आणि विस्तारित फ्री वे या रस्त्याला जोडावा, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

ठाण्यातील तीन हात नाका येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची आखणी ठाणे महापालिकेने केली असून या प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी देण्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली. तसेच, कोपरी-पटणी खाडी पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिले.
 

Web Title: Eknath Shinde Announces Priority to Virar-Alibaug Multimodal Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.