Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:26 IST

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे आणि संजय राऊत समोरासमोर

Sanjay Raut Eknath Shinde Meet: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच, राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली. या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एकीकडे सभेमागून सभा आणि आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. गेल्या काही महिन्यांपासून संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल, याबाबत आता चर्चा केली जात आहेत.

नेमकी भेट कुठे आणि कशी झाली?

मुंबईत आयोजित एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते निमंत्रित होते. याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची समोरासमोर भेट झाली. केवळ नजरानजर न होता दोघांमध्ये सुमारे एक ते दीड मिनिटे बातचीत देखील झाली.

'त्या' दीड मिनिटांच्या संवादात काय घडलं?

राजकीय मतभेद बाजूला ठेवून या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या आरोग्याबद्दल आस्थेने विचारणा केली, तर राऊत यांनीही त्यांना प्रतिसाद दिला. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक आणि सौजन्यपूर्ण होती.

यापूर्वीही जेव्हा संजय राऊत यांची तब्येत खालावली होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे राजकारणात कितीही संघर्ष असला तरी वैयक्तिक पातळीवर या नेत्यांनी अजूनही संवाद जपला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raut and Shinde's unexpected meeting amid elections sparks political buzz.

Web Summary : Amidst political turmoil, Eknath Shinde and Sanjay Raut met unexpectedly at an event. They exchanged pleasantries, inquired about each other's health, setting off speculation despite their ongoing political rivalry. This informal interaction highlights personal connections beyond political clashes.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६संजय राऊतएकनाथ शिंदे