Join us

BMC निवडणुकीआधी पक्षातील ५०-६० माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 09:29 IST

अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबले होते असं किर्तीकर म्हणाले.

मुंबई - एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निकाल सुनावला. अपात्रतेबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवरील संकट टळले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत करता आली असती असं कोर्टाने सांगितले. त्याचसोबत बहुमत चाचणीपूर्वीच ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे आत्ताचे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असंही कोर्टाने स्पष्ट केले आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. 

आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. बीएमसीमधील ५०-६० माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्याचसोबत शिवसेनेचे लोकसभेतील खासदार गजानन किर्तीकर यांनीही सूचक विधान केले आहे. 

अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबले होते. आता हे नेते शिवसेनेत प्रवेश करतील. त्यात अनेक मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा समावेश आहे. त्यातील ६ नगरसेवक वैयक्तिक माझ्या संपर्कात आहेत. या नगरसेवकांना धनुष्यबाण चिन्हाखाली निवडणूक लढवायची आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे आमच्याकडे आहे असं खासदार गजानन किर्तीकर म्हणाले. 

महापालिकेच्या निवडणुका कधी होणार?कोरोना काळात अनेक महापालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यात प्रामुख्याने ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक यासह विविध प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महापालिकेत कुठलेही लोकप्रतिनिधी नसल्याने सध्या पालिकेचा कारभार प्रशासकाकडून हाकला जात आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने अधिकृतपणे त्यांना पालिका अधिकाऱ्यांना कामाविषयी जाब विचारता येत नाही. त्यामुळे लवकर महापालिका निवडणुका घ्याव्यात अशी मागणी सर्वांकडून होत आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना