Join us
Daily Top 2Weekly Top 5

कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकर यांची आठ तास ईडी चौकशी

By मनोज गडनीस | Updated: April 8, 2024 20:05 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभेसाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती.

मुंबई - कोरोना काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स जारी केल्यानंतर अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आणि सायंकाळी ७ च्या दरम्यान ते तेथून बाहेर आले.

यापूर्वी २७ मार्च रोजी त्यांना पहिल्यांदा ईडीने चौकशीसाठी समन्स जारी केले होते. त्याच दिवशी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभेसाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी ते चौकशीसाठी गेले नव्हते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी त्यांनी चौकशीसाठी हजर राहावे, याकरिता त्यांना ईडीने  दुसऱ्यांदा समन्स जारी केले होते. दरम्यान, ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना किर्तीकर म्हणाले की, मी चौकशीत पूर्ण सहकार्य केले आहे. मला जे प्रश्न विचारले त्याची मी उत्तरे अधिकाऱ्यांना दिली आहेत. मला ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावलेले नाही.

टॅग्स :उद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४मुंबई उत्तर पश्चिमअंमलबजावणी संचालनालय