सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:02 IST2025-10-08T13:00:53+5:302025-10-08T13:02:22+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोला याच्या ठिकाणांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे.

सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
Drug Lord Salim dola: अंमलबजावणी संचालनालयाने अंडरवर्ल्डविरुद्धची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरु केली आहे. ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोला याच्या ड्रग्ज नेटवर्कवर मुंबईत छापे टाकले आहे. बुधवारी ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत मुंबईतील आठ ठिकाणी छापे टाकले. फैसल जावेद शेख आणि अल्फिया फैसल शेख यांनी चालवलेल्या मोठ्या ड्रग्ज तस्करी नेटवर्कच्या बेकायदेशीर रकमेचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. तपासात फैसल शेख हा ड्रग्ज लॉर्ड सलीम डोला मार्फत एमडी खरेदी करत होता. सलीम डोला बऱ्याच काळापासून ईडीच्या रडारावर आहे आणि त्याच्यावर ड्रग्ज सलीम डोला हा ड्रग्ज तस्करी जगातील एक प्रमुख व्यक्ती आहे आणि त्याच्याविरुद्ध आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत.
सलीम डोला हा बराच काळ फरार असल्याने आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कला निधी पुरवण्यात सहभागी असल्याने त्याच्या अटकेसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने बक्षीस जाहीर केले आहे. मुंबईत ड्रग्ज तस्करी आणि हवाला यांच्यातील खोल संबंध उघड करण्यासाठी ईडीची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जाते. ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्याची चौकशी महाराष्ट्रातील सांगली, नंतर सुरत, गुजरात आणि नंतर परदेशात युएई आणि शेवटी तुर्कीपर्यंत पोहोचली होती.
या ड्रग्ज तस्करी रॅकेटचा प्रमुख सूत्रधार सलीम इस्माईल डोला होता जो मुंबईच्या कॉटन ग्रीन परिसरातील रहिवासी आहे. डोला हा ड्रग्ज जगतात सर्वात जास्त महत्त्वाचा आहे कारण त्याचे दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील ड्रग्ज कार्टेलशी संबंध असल्याचे समोर आलं होतं. १९९८ मध्ये, डोलाला मुंबई विमानतळावर ४० किलोग्रॅम मॅन्ड्रेक्ससह अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये, मुंबई विमानतळाजवळ १,००० कोटी रुपयांच्या फेंटॅनिल ड्रग्ज जप्त करण्याच्या प्रयत्नात सलीम डोलाचे नाव समोर आले. महसूल गुप्तचर संचालनालयाने त्याला ५.५ कोटी रुपयांच्या गुटख्याच्या तस्करीप्रकरणी अटकही केली होती. मात्र एनडीपीएस कायद्यातील त्रुटींबद्दल बरीच माहिती असल्याने त्याला पळवाटा माहिती होत्या.
२०१८ मध्ये, डोला देश सोडून पळून गेला आणि युएईला स्थायिक झाला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोलाच्या अटकेची माहिती देणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. एका अधिकाऱ्याच्या मते, डोला स्वतः ड्रग्ज घेत नाही पण तो दारू पितो. त्याचा मुलगा ताहिर ड्रग्जचे सेवन करतो. डोलाने त्याचे काम त्याच्या मुलाच्या ऐवजी सलीम शेख उर्फ लविशवकडे सोपवले होते. तोही सध्या युएईमध्ये आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात चार जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून ४ किलो मेफेड्रोन जप्त केले. पोलिसांना हे ड्रग्ज सांगली जिल्ह्यातील इर्ली गावातील एका कारखान्यातून तयार केले जात असल्याचे आढळले. पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला आणि १२२ किलोग्राम मेफेड्रोन जप्त केले. त्यांनी डोलाचा पुतण्या मुस्तफा कुब्बावालाचे नाव पुढे आले आणि आणखी सहा जणांना अटक केली. मुस्तफा वारंवार युएई आणि सुरत दरम्यान प्रवास करत असे आणि तेथून हे केमिकल घेऊन येत असे. पोलिस तपासात मुस्तफा, डोलाचा मुलगा ताहिर याच्यासोबत युएईमधून हे रॅकेट चालवत होते.
मुंबई पोलिसांनी ताहिर आणि मुस्तफा यांना अटक करायची होती. त्यामुळे गुन्हे शाखेने सीबीआयमार्फत त्यांचे आरोपपत्र यूएई अधिकाऱ्यांना पाठवले. त्यानंतर ताहिर आणि मुस्तफा यांना अटक करून भारतात आणण्यात आले. चौकशीदरम्यान मुस्तफाने सांगितले की त्याने सुरतमधील ब्रिजेश मोराबियाकडून ब्रोमाइड केमिकल मिळवले होते, जो बनावट औषध कंपनी चालवत होता. त्यानंतर पोलिसांनी मोराबियालाही अटक केली.