नवाब मलिकांच्या मुलाला मुदतवाढ देण्यास ईडीचा नकार; फराज यांची चौकशीला गैरहजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 05:45 IST2022-03-02T05:44:01+5:302022-03-02T05:45:19+5:30
ईडीने मागणी केलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी फराज यांनी आठवड्याभराची मुदत देण्याची मागणी केली होती.

नवाब मलिकांच्या मुलाला मुदतवाढ देण्यास ईडीचा नकार; फराज यांची चौकशीला गैरहजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांचा मुलगा फराज यांना समन्स बजावण्यात आला आहे. मात्र, ईडीने मागणी केलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी फराज यांनी आठवड्याभराची मुदत देण्याची मागणी केली होती. मात्र, ईडीने ही मागणी फेटाळली आहे.
ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे ईडीने त्यांचा मुलगा फराजला सोमवारी समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. कुर्ला जमीन व्यवहारात तो सक्रिय होता. फराज यानेच विक्री करारासह मालमत्तेशी संबंधित अन्य कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तसेच त्याने हसीना पारकर हिच्यासह तिच्या सहकाऱ्यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात इतर दोघांसह भेट घेत ५५ लाख रुपये दिले होते. या मालमत्तेचा सौदा १९९९ ते २००३ या दरम्यान झाला होता. त्यामुळे फराजकडे चौकशी करत याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. ईडीने मागितलेल्या कागदपत्रांसाठी फराज यांच्याकडून आठवड्याभराची मुदत मागत ते चौकशीला हजर झाले नाहीत. पण ईडीने त्यांची ही मागणी फेटाळली आहे.