फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे कंपन्यांवर ईडीची छापेमारी, ‘सुपर लाईक ॲप’ पार्ट टाइम जॉब घोटाळाप्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:49 IST2022-11-18T11:48:05+5:302022-11-18T11:49:08+5:30
ED raids: सुपर लाइक नावाच्या ॲपच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना गंडा घालणाऱ्या पार्ट टाइम जॉब घोटाळाप्रकरणी सोमवार आणि मंगळवारी ईडीने बंगळुरू येथे फोन-पे, गुगल पे, अॅमेझॉन तसेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, धनलक्ष्मी बँक आदी कंपन्यांच्या कार्यालयांवर एकूण १६ ठिकाणी छापेमारी केली.

फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे कंपन्यांवर ईडीची छापेमारी, ‘सुपर लाईक ॲप’ पार्ट टाइम जॉब घोटाळाप्रकरणी कारवाई
मुंबई : सुपर लाइक नावाच्या ॲपच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना गंडा घालणाऱ्या पार्ट टाइम जॉब घोटाळाप्रकरणी सोमवार आणि मंगळवारी ईडीने बंगळुरू येथे फोन-पे, गुगल पे, अॅमेझॉन तसेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, धनलक्ष्मी बँक आदी कंपन्यांच्या कार्यालयांवर एकूण १६ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान या सर्व कंपन्यांच्या मिळून ८० बँक खात्यात असलेली एक कोटी रुपयांची रक्कम देखील जप्त केली आहे. या प्रकरणी गेल्या महिनाभरात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे.
या प्रकरणी ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुपर लाइक नावाचे एक ॲप दोन वर्षांपूर्वी बाजारात आले होते. या ॲपच्या माध्यमातून लोकांना पार्ट टाइम जॉब केल्याप्रमाणे अधिकचे पैसे घरबसल्या मिळतील, असा दावा कंपनीने केला होता. याकरिता कंपनीच्या ॲपवर लोकांना नोंदणी करून काही पैसे भरण्यास सांगितले होते. तसेच त्या ॲपवर विविध सेलिब्रिटींचे फोटो कंपनीतर्फे शेअर करण्यात येत होते. या फोटोंवर कमेंट करणे ते शेअर करून प्रमोट केल्यास संबंधित ग्राहकास कंपनी पैसे देत होती. सुरुवातीच्या काही टप्प्यांत ग्राहकांना या ॲपने पैसे दिले होते. मात्र, कालांतराने या ॲपने ग्राहकांना पैसे देणे बंद केले तसेच ग्राहकांनी नोंदणी करतेवेळी जे पैसे या ॲपमध्ये भरले होते ते देखील ग्राहकांना परत मिळाले नाहीत. या प्रकरणी दक्षिण बंगळुरू येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हा घोटाळा देशव्यापी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला होता.
या घोटाळ्यामध्ये केवळ सुपर लाइक कंपनीच नव्हे तर ऑनलाइन पेमेंट सुविधा पुरविणारी ॲप आणि काही प्रमुख बँकादेखील सहभागी असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना असून त्या संदर्भात ही छापेमारी झाली आहे.