Join us

संजय राऊत यांच्या निकटवर्तीय बिल्डरवर ईडीची छापेमारी; अडचणीत वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 06:41 IST

उपलब्ध माहितीनुसार, मुलुंड येथील श्रद्धा बिल्डर कंपनीवर बुधवारी ईडीने छापेमारी केल्याचे समजते.

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या मुंबईतील एका बिल्डरसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी छापेमारी केली. 

उपलब्ध माहितीनुसार, मुलुंड येथील श्रद्धा बिल्डर कंपनीवर बुधवारी ईडीने छापेमारी केल्याचे समजते. या दरम्यान, कंपनीची कागदपत्रे तसेच संगणकाचीदेखील तपासणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. श्रद्धा बिल्डर यांचे बरेचसे बांधकाम हे विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात आहे. यातील बहुतांश बांधकाम हे संजय राऊत यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील आहे. यातील काही बांधकाम प्रकल्प पूर्ण झालेले आहेत तर काहींचे बांधकाम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केल्याचे समजते.

पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत आणखीही काही ठिकाणी छापेमारी केली आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, गेल्या १ ऑगस्ट रोजी ईडीने राऊत यांना अटक केली. सध्या राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. या प्रकरणी एप्रिल महिन्यात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट, अलिबागमधील भूखंड अशी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून १ ऑक्टोबरपूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे समजते.

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालय