महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:39 IST2025-11-28T06:35:37+5:302025-11-28T06:39:38+5:30
मुंबईतील ‘टीस’चे कुलपती डी. पी. सिंग हेही आरोपी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकारी हे रॅकेट चालवीत होते. आरोग्य मंत्रालयातील माहिती, फाइलची छायाचित्रे काढून ती खासगी महाविद्यालयांना पाठविण्यात येत होती.

महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
मुंबई - केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह नॅशनल मेडिकल कमिशनकडून होणाऱ्या खासगी वैद्यकीयमहाविद्यालयांना तपासणीची आगाऊ माहिती देऊन त्यांना सावध करण्याच्या बदल्यात कोट्यवधींची लाचखोरी केल्याप्रकरणी ईडीने गुरुवारी कारवाई केली. महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये १५ ठिकाणी छापे मारले. यात विविध राज्यांतील सात वैद्यकीयमहाविद्यालयांचा समावेश आहे.
या प्रकरणात ३६ आरोपी असून, केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे(टीस) कुलपती डी.पी.सिंग हेही आरोपी आहेत. या प्रकरणात सर्वप्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. ईडीने आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकारी हे रॅकेट चालवीत होते. आरोग्य मंत्रालयातील माहिती, फाइलची छायाचित्रे काढून ती खासगी महाविद्यालयांना पाठविण्यात येत होती. त्यामुळे जेंव्हा पाहणी पथक एखाद्या महाविद्यालयात जात असे, त्यांची माहिती आधीच या महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांना मिळत असे. त्यानुसार, या महाविद्यालयातील अधिकारी बोगस रुग्ण, बोगस कर्मचारी तिथे दाखवत असत. हे केल्यामुळे या महाविद्यालयांना त्यांच्या कामांना परवानगी मिळणे सुसह्य ठरत होते. या माहितीच्या मोबदल्यात मंत्रालयातील तसेच नॅशनल मेडिकल कमिशनमधील उच्चाधिकाऱ्यांना लाखो रुपयांची लाच मिळत असे.
घोटाळा असा उघडकीस
चंदिगड येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला अनुकूल अहवाल देण्यासाठी आठ अधिकाऱ्यांनी एकूण ५५ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यामध्ये नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या ३ डॉक्टरांचा समावेश होता. या आठही जणांना सीबीआयने अटक केल्यानंतर या देशव्यापी रॅकेटचा पर्दाफाश झाला.
रायपूरमध्ये सर्वाधिक घोटाळा
रायपूर आणि नवा रायपूरमधील सहा वैद्यकीय महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय कर्नाटक, विशाखापट्टणम, वारंगर, हैदराबाद अशा दक्षिण भारतातील काही महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
या राज्यांमध्ये कारवाई : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
१. डी. पी. सिंग, कुलपती, टीआयएसएस, मुंबई
२. रवी शंकर महाराज, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, रायपूर
३. डॉ. चित्रा एमएस, नॅशनल मेडिकल कमिशन
४. डॉ. रजनी रेड्डी, नॅशनल मेडिकल कमिशन
५. डॉ. अशोक शेळके, नॅशनल मेडिकल कमिशन