Join us

‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 06:03 IST

आतापर्यंत सोसायटीची एकूण १०९७ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी सोसायटीची १००२ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंडांचा समावेश आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ईडीने सोसायटीची ८५ कोटी ८८ लाख रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथील काही फ्लॅट, कार्यालयांची जागा आणि भूखंड, आदींचा समावेश होता. आतापर्यंत सोसायटीची एकूण १०९७ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी परतावा दिला. मात्र, त्यानंतर तो दिला नाही तर अनेक गुंतवणूकदारांना एक रुपयादेखील परत मिळालेला नाही. कुटे यांनी २३१८ कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळवल्याचा ठपकाही ईडीने त्यांच्यावर ठेवला.

किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा

ज्ञानराधा सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या. तसेच, सोसायटीने सोने, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज अशा कर्ज योजनादेखील सादर केल्या होत्या. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांच्या नियंत्रणाखाली सोसायटीचे काम होत होते. त्यांनी राज्यभरातील किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले आहे.

 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयधाड