ED interrogates Rhea Chakraborty Shruti Modi on Sushant Singh Rajputs Rs 4 30 crore Fixed Deposit | Sushant Singh Rajput Death Case: अवघ्या २ दिवसांत सुशांतनं 'इतक्या' कोटींची एफडी का मोडली?; ईडीकडून तपास सुरू

Sushant Singh Rajput Death Case: अवघ्या २ दिवसांत सुशांतनं 'इतक्या' कोटींची एफडी का मोडली?; ईडीकडून तपास सुरू

- जमीर काझी 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या संपत्तीतील संशयास्पद अनियमिततेबद्दल दाखल गुन्ह्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अनेकांकडे शेकडो तास चौकशी करूनही अनेक प्रश्नांची उत्तरे अर्धवट आहेत. सुशांतने साडेचार कोटींची बँकेतील मुदत ठेव अवघ्या दोन दिवसांत का मोडली?, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा ईडीकडून तपास सुरू आहे.

कोटक महिंद्रा बँकेत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुशांतने ही रक्कम ठेवली होती. याबाबत त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह तिचे वडील, भाऊ आणि सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांनी कानावर हात ठेवले आहेत. त्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा जबाब त्यांनी दिला आहे.

रिया व तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून जप्त केलेले मोबाइल, लॅपटॉपच्या तपासणीतून त्याबाबत माहिती घेतली जात आहे, असे ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आवश्यकतेनुसार संशयितांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजीत यांच्यासह सहा जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या १० दिवसांमध्ये त्यांच्या चौकशीच्या अनेक फेºया झाल्या आहेत. त्यांचे सुशांतशी संबंध, अर्थपूर्ण व्यवहार, भागीदारीबाबत सविस्तर माहिती घेतली जात आहे.

सुशांतने गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला कोटक महिंद्रा बँकेत दोन खात्यांवर अनुक्रमे दोन आणि अडीच कोटी अशी एकूण ४.५० कोटींची मुदतठेव केली. मात्र २८ नोव्हेंबरला त्याने ती मोडली आणि त्याऐवजी प्रत्येकी एक कोटी ठेवल्याचे स्पष्ट झाले. मात्र ठेव ठेवल्यानंतर अवघ्या ४८ तासांत त्यामध्ये बदल का केला? उरलेली रक्कम कोठे वापरली, याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्याबाबत रिया, तिचा भाऊ, वडिलांना विचारल्यावर त्यांनी काही माहिती नाही, असे उत्तर दिले. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि त्याच्याकडे व्यवसाय व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या श्रुती मोदीनेही त्याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. श्रुतीने त्याच्या बँक व्यवहाराबाबत काही माहिती नाही, तो विषय आपण पाहत नव्हतो, असा जबाब दिल्याचे समजते.

अडीच कोटी भरला कर
रियाने गेल्या ४ वर्षांचा प्राप्तिकर परतावा ईडीकडे सादर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चार वर्षांचे एकूण उत्पन्न सुमारे ६६ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
सुशांतसिंह राजपूत याच्या आतापर्यंतच्या खात्यांच्या तपासणी दरम्यान त्याच्या खात्यात १० कोटी रुपये असल्याचे उघड झाले आहे. पण, सुशांतचा खर्चही मोठा होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने जीएसटी आणि अडीच कोटी रुपयांचा कर भरला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ED interrogates Rhea Chakraborty Shruti Modi on Sushant Singh Rajputs Rs 4 30 crore Fixed Deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.