Join us

प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच; वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:36 IST

उपलब्ध माहितीनुसार, वरळीतील सीजे हाऊस या प्रॉपर्टीचा पुनर्विकास प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केला होता. या प्लॉटवर इक्बाल मिर्चीचीही काही मालमत्ता होती. पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या इमारतीत मिर्चीला दोन मजले देण्यात आले होते.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीच्या वरळी येथील सीजे हाऊस या आलिशान इमारतीतील चार मजले सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केले आहेत. गेल्या वर्षी २१ जुलैला ईडीने या चार मजल्यांवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली होती. मात्र, ईडीच्या पडताळणी विभागाने छाननीची प्रक्रिया पूर्ण करीत या चारही मजल्यांची कायमस्वरूपी जप्तीची कारवाई बुधवारी केली. यामुळे आता प्रफुल्ल पटेल यांना हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत. हे प्रकरण मृत ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याच्याशी निगडित आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, वरळीतील सीजे हाऊस या प्रॉपर्टीचा पुनर्विकास प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केला होता. या प्लॉटवर इक्बाल मिर्चीचीही काही मालमत्ता होती. पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या इमारतीत मिर्चीला दोन मजले देण्यात आले होते. या प्रकरणी २०१९ मधे पटेल यांनी चौकशीदरम्यान ही माहिती दिली. तीन वर्षांपूर्वी डीएचएफएल प्रकरणात कंपनीचे मालक वाधवान बंधूना ईडीने अटक केली होती. त्यावेळी त्यांचा संबंध इक्बाल मिर्चीशी आल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. त्यानंतर ईडीने मिर्चीच्या विविध मालमत्ता जप्त केल्या. त्यात सीजे हाऊस इमारतीमधील दोन मजले, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन दुकाने, साहिल बंगला, राबिया मॅन्शन, मरियम लॉज, लोणावळा येथील पाच एकर जागा, पाचगणी येथील मालमत्ता दुबई आणि इंग्लंडमधील काही मालमत्तादेखील ईडीने जप्त केली होती. 

टॅग्स :प्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेसअंमलबजावणी संचालनालय