लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टोरेस कंपनीत १६,७८८ गुंतवणूकदारांची १४० कोटी रुपयांना फसवणूक झाली आहे. त्यातील ३५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लवकरात मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात विविध कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची फसवणूक होत आहे. टोरेससारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग (इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट) सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. हा विभाग फसवणुकीचे गुन्हे टाळण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.
आ. विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री कदम यांनी टोरेस कंपनी फसवणुकीप्रकरणी मुंबईच्या शिवाजी पार्क, नवी मुंबईच्या एपीएमसी, ठाण्यातील राबोडी आणि मीरा-भाईंदर येथील नवघर अशा पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, अशी माहिती दिली.
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत एका संचालकासह ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोने-चांदी-हिरे दागिणे, अनामत रक्कम, बँक खात्यातील रक्कम, वाहने अशी मिळून सुमारे ३५ कोटींची वसुली केली आहे, असेही मंत्री कदम यांनी सभागृहात सांगितले.