कोरोनामुळे आर्थिक संकट, लोककलेला आता राजाश्रय मिळायला हवा; लोककलावंत नंदेश उमप यांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:19 AM2021-04-29T07:19:16+5:302021-04-29T07:20:02+5:30

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा परिणाम विविध घटकांसह लोककलावंतांवरही ओघाने झाला आणि या कलावंतांवरही सर्व बाजूंनी या अवघड ...

Economic crisis due to corona; Folk art should now get royal patronage; said folk artist Nandesh Umap | कोरोनामुळे आर्थिक संकट, लोककलेला आता राजाश्रय मिळायला हवा; लोककलावंत नंदेश उमप यांचे साकडे

कोरोनामुळे आर्थिक संकट, लोककलेला आता राजाश्रय मिळायला हवा; लोककलावंत नंदेश उमप यांचे साकडे

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा परिणाम विविध घटकांसह लोककलावंतांवरही ओघाने झाला आणि या कलावंतांवरही सर्व बाजूंनी या अवघड परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली. या पार्श्वभूमीवर लोककलेच्या प्रांगणात मुशाफिरी करणारे लोककलावंत नंदेश उमप यांच्याशी साधलेला संवाद...

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका लोककलावंतांना कशा प्रकारे बसत आहे?
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळाची आणि या वर्षीची स्थितीही फार काही वेगळी नाही. पहिली हानी होतेय, ती आमच्या कलाक्षेत्राची ! मग ते तंत्रज्ञ असो किंवा साउण्ड, लाइट, मंडप डेकोरेटर, केटरर असे कामगार असोत. सगळ्यात जास्त फटका लोककलावंतांना बसलेला आहे. जे लोककलावंत चार-पाचशे रुपयांमध्ये काम करतात, त्यांची गेली सव्वा वर्षे अविरत हेळसांड होत आली आहे.

लोककलावंतांना कशा प्रकारच्या साहाय्याची अपेक्षा आहे?

महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा या लोककलावंतांनीच पुढे येऊन संस्कृती रक्षणाची जबाबदारी उचलली आहे. सध्या कलावंतांना वाचवण्याची जबाबदारी शासनावर आहे, असे मला वाटते. ज्या कलावंतांना तुटपुंजे मानधन मिळते, त्यांच्या उपजीविकेचा शासनाने विचार करावा आणि त्यांची फरफट होणार नाही याकडे लक्ष द्यावे. कोरोनाच्या विरोधात कलावंतांचा वापर शासनाने हत्यारासारखा केला, तर कुठलाही कलाकार  ‘नाही’  म्हणणार नाही. कारण कला हेच त्याचे जीवन आहे. आम्ही सगळे कलावंत शासनासोबत आहोत, भारतासोबत आहोत. लोकही आमच्यासोबत आहेत. आम्ही लोकांसाठी जनजागृती करू शकतो. शासनाने त्यासाठी आम्हाला काहीतरी मानधन द्यावे आणि सगळ्या लोककलावंतांना काम मिळेल याची जबाबदारी घ्यावी. कठीणप्रसंगी हे कलाकार नेहमीच उभे राहिलेले आहेत, तर मला असे वाटते की, कलाकारांच्या वाईट काळात शासनाने त्यांच्या पाठीशी मायबापासारखे उभे राहावे.

लोककलावंतांना पाठबळ मिळण्यासाठी काय करायला हवे?

छत्रपती शिवरायांच्या काळापासून लोककलावंतांनी महाराष्ट्राची मशाल तेवत ठेवली. १९४२चा लढा, स्वातंत्र्याचा लढा, तसेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो; या सगळ्यात शासनाला लोककलावंतांची गरज लागते. एक कलावंत हजार लोकांचे मतपरिवर्तन करू शकतो. अशा कलावंतांसाठी कोरोनाच्या काळात शासनाने काय करायला हवे, याचा विचार व्हायला हवा. हे संकट सर्वांवर आहेे; पण लोककलावंतांवर आलेले संकट हे किंबहुना जास्त आहे. पावसाचे चार महिने तर या मंडळींना घरी बसून काढावे लागतात. त्यामुळे शासनाने या लोककलावंतांच्या खात्यामध्ये किमान चार ते पाच महिने, प्रत्येकी दोन ते तीन हजार रुपये त्यांच्या सोयीनुसार टाकावेत, अशी विनंती आहे. या संकटातून मुक्त होण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी या कलावंतांना शासनाने छोटे-छोटे कार्यक्रम द्यावेत. मास्क आणि सामाजिक अंतर पाळत हे कलावंत शासनाचे काम करतील. रस्त्यारस्त्यावर, पाड्यापाड्यावर, गल्लीबोळात हे कलावंत प्रचार व प्रसाराचे काम करू शकतील.
(मुलाखत : राज चिंचणकर)

Web Title: Economic crisis due to corona; Folk art should now get royal patronage; said folk artist Nandesh Umap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.