बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:39 PM2023-03-22T12:39:59+5:302023-03-22T12:40:27+5:30

अशुद्ध पाण्याचा बर्फ निश्चितच आरोग्य बिघडवू शकतो. अशुद्ध पाण्यापासून तयार होणाऱ्या बर्फामुळे पोटाचा त्रास, सर्दी, ताप, खोकला होण्याची जास्त शक्यता असते.

Eating a snow gola, have you seen the license? Poor quality ice is being used in many places | बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर

बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर

googlenewsNext

मुंबई :  उन्हाळा सुरू झाला असून, वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे अनेकांची पावले शीतगृहांकडे वळू लागली आहेत.  शीतपेय आणि बर्फ गोळे विक्रीची दुकाने सर्वत्र दिसू लागली आहेत; परंतु अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर केला जात असून बर्फाला रासायनिक रंग लावला जात आहे. परिणामी विक्री केला जाणारा बर्फ गोळा शुद्धतेच्या मानकावर कितपत खरा उतरलेला आहे, याबाबत संभ्रमावस्था आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, तरी याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

अशुद्ध पाण्याचा बर्फ निश्चितच आरोग्य बिघडवू शकतो. अशुद्ध पाण्यापासून तयार होणाऱ्या बर्फामुळे पोटाचा त्रास, सर्दी, ताप, खोकला होण्याची जास्त शक्यता असते. या व्यवसायाशी जुळलेले लोक साखरेऐवजी सॅक्रिनचा जास्त उपयोग करतात. त्यामुळे धोका जास्त वाढतो. तसेच बर्फाचा गोळा आणि आईस्क्रिमला गोडवा आणण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलचाही वापर करतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा रंग निळा
खाण्यायोग्य बर्फाचा रंग पांढरा आणि पारदर्शक असतो. तर खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा रंग निळा असतो. निळ्या रंगाचा बर्फ कारखान्यांमध्ये उपयोगात येतो. खाण्याचा बर्फ हा शुद्ध पाण्यापासूनच तयार झालेला असावा.

...तर आजाराला आमंत्रण द्याल
बर्फाचा गोळा विकणाऱ्यांकडे परवाना नाही. विक्रेते हे हंगामी व्यवसाय करणारे असतात. त्यामुळे ते परवाना काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. विक्रेत्यांच्या स्टॉलवर दर्शनी भागात परवान्याचा फोटो नसतोच. परवाना नसलेल्या फेरीवाल्यांकडून बर्फाचा गोळा खाणे म्हणजे आजाराला आमंत्रण देणे आहे.

विक्रेत्यांवर कारवाई
दरवर्षी अन्न औषध प्रशासनाकडून बर्फ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते, गेल्यावर्षी शहर उपनगरात १०० हून अधिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली आहे.

प्रशासनाची तपासणी मोहीम 
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे बर्फ गोळा विक्रेत्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान परवाना नसलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परवाना काढण्यासाठी त्यांना बंधनकारक करण्यात येत आहे.

Web Title: Eating a snow gola, have you seen the license? Poor quality ice is being used in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई