East Freeway : Poor condition of cement concrete road | पूर्व मुक्त मार्ग : सिमेंट काँक्रिट रस्त्याची दुरावस्था

पूर्व मुक्त मार्ग : सिमेंट काँक्रिट रस्त्याची दुरावस्था

मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरील भक्ती पार्क ते चेंबूर या सिमेंट काँक्रिट मार्गाच्या दोन्ही बाजू अतिशय वाईट अवस्थेत असून  वाहनचालकांना वाहन चालवताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे साधे लक्ष ही जाऊ नये ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल, अशी टीका होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत मुंबई महापालिका आणि एमएमआरडीए यांना याबाबत माहिती देऊनही काहीच कार्यवाही केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील रस्ते पावसाळा संपले तरी नीट झाले नाहीत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे समजत नाही, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे. मुळात छोटे, मोठे रस्ते वाईट अवस्थेत असून, अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय मुंबईत ठीकठिकाणी कामे सुरु असून, या कामांमुळे अनेक अडचणी येत आहेत. परिणामी रस्ते सुस्थितीत करावेत, असे नागरिकांचे म्हणणे असुन, याबाबत मनसेचे मिलिंद मुरारी पांचाळ यांनी प्रशानासोबत पत्र व्यवहार केला आहे.

प्रशानासोबत केलेल्या पत्र व्यवहारानुसार, येथील मार्गावर सी.सी.मार्ग बनवताना मनपाच्या नियमांचे, अटी-शर्थीचे पालन केले गेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. कारण सी.सी.मार्ग हा कमीत कमी तीस वर्षे टिकेल अशा पद्धतीने बनवला गेला पाहिजे. मात्र २०१३ मध्ये बनवलेला रस्ता ७-८ वर्षातच निकृष्ट दर्जाचा होतो. याचा अर्थच असा की, या कामाकडे हवे तसे लक्ष दिले गेले नाही. एम.एम.आर.डी.ए कडून हस्तांतरित करून घेताना या मार्गाची तपासणी करून घेण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

दुसरा मुद्दा असा की एखादा रस्ता नव्याने बनवत असताना त्यासाठी असणाऱ्या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला गेला होता का? जसे क्रॅश बॅरिअर, पेंटिंग, सीसीटिव्ह, आपत्कालीन टोल फ्री नंबर अशा अनेक घटकांचा विचार करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. आणि ज्या ठेकेदारांना ही कामे दिली गेली होती त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई होणार? असे अनेक मुद्दे दुर्लक्षित आहेत. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात महापालिका कार्यवाही करणार की एमएमआरडीए? हे देखील नीट समोर आले तर रस्त्याचा प्रश्न सुटेल, असे म्हणणे मांडले जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: East Freeway : Poor condition of cement concrete road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.