ई-बाइक टॅक्सीचा निर्णय वादात, रिक्षा चालकांचा मोर्चा; विराेध असला, तरी वाहतूक तज्ज्ञ मात्र निर्णयांच्या बाजूने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:22 IST2025-05-22T14:22:44+5:302025-05-22T14:22:59+5:30
राज्य शासनाने ई-बाइक टॅक्सीबद्दल घेतलेल्या निर्णयानुसार आता एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे; परंतु राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवल्याने हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

ई-बाइक टॅक्सीचा निर्णय वादात, रिक्षा चालकांचा मोर्चा; विराेध असला, तरी वाहतूक तज्ज्ञ मात्र निर्णयांच्या बाजूने
मुंबई : राज्य शासनाने ई-बाइक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीने रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी शेकडो रिक्षा चालक-मालकांनी रिक्षासह अंधेरी उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, या धोरणाला विरोध होत असला तरी सार्वजनिक वाहतुकीसाठी हा उत्तम पर्याय ठरणार असून रोजगाराच्या नवीन संधीही त्यातून उपलब्ध होतील, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्य शासनाने ई-बाइक टॅक्सीबद्दल घेतलेल्या निर्णयानुसार आता एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे; परंतु राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवल्याने हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील १५ लाख रिक्षाचालकांचा रोजगार मात्र धोक्यात येणार आहे. त्यामुळे हा एकतर्फी निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी ऑटो रिक्षा- टॅक्सी संघटनेने केली आहे.
बाइक टॅक्सीमुळे वाहतूककोंडी कमी होईल
दुसऱ्या बाजूला वाहतूक तज्ज्ञांच्या मते मुंबईसारख्या निमुळते रस्ते असलेल्या शहरामध्ये ई-बाइक टॅक्सीमुळे प्रवाशांना जलद आणि कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे आहे.
या बाइक टॅक्सीमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईलच, सोबतच खासगी बाइकचा वापरही कमी होईल. त्यातून पर्यावरणाचे संवर्धन होण्यास देखील मदत होणार आहे. त्यातच सर्वांना रोजगार मिळवण्याचा अधिकार मिळेल.
नव्या वाहतूक पर्यायामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मनमानीला आळा बसेल. प्रवासी सुरक्षेला आणि आरामाला प्राधान्य देत महिला प्रवाशाला महिला चालक नेमण्याचा पर्याय देणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी सुनियोजित होणे आवश्यक आहे.
ॲड. शिरीष देशपांडे,
कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शहरे आणि ग्रामीण विभागातील आरटीओसमोर आम्ही निदर्शने केली आहेत. ई-बाइक टॅक्सीला दिलेली परवानगी रद्द करावी, याकरिता सर्व रिक्षाचालकांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वाक्षरी केलेले निवेदन सरकारला १५ जूनदरम्यान देण्यात येईल.
शशांक राव, अध्यक्ष,
ऑटोरिक्षा चालक- मालक संघटना संयुक्त कृती समिती
वाहतूक कोंडी असलेल्या मुंबईसारख्या शहरांसाठी ई-बाइक टॅक्सी हा उत्तम पर्याय आहे. इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसोबत हा नवीन पर्याय चांगला आहे. यामुळे नवीन रोजगार निर्मिती होण्यासदेखील मदत होईल. मात्र, ई-बाइक टॅक्सीचे व्यवस्थित नियोजन केले जायला हवे आणि त्यासाठी सुरक्षेचे नियम काटेकोर पळाले जायाला हवेत.
अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ
ई-बाइक टॅक्सीचे फायदे
वाहतूक कोंडीपासून बचाव
छोट्या गाड्यांमुळे ट्रॅफिकमध्ये सहज जाऊ शकतात, वेळ
वाचतो.
कार टॅक्सीच्या तुलनेत बाईक टॅक्सीचा दर कमी, किफायतशीर प्रवास
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे शक्य
तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी
एकट्या प्रवाशांसाठी सोईस्कर पर्याय
ई-बाइक टॅक्सीबद्दल आक्षेप
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत साशंकता
हेल्मेट नसेल तर असुरक्षित प्रवास होण्याची शक्यता
लांबच्या प्रवासासाठी सुरक्षित नाही
पावसात चारचाकीच्या तुलनेत त्रासदायक प्रवास
सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांमुळे मुंबईसारख्या शहरांत वाहतूककोंडीत भर
बॅग/सामान वाहून नेण्यास मर्यादा
प्रवासी संख्येची मर्यादा, कुटुंब किंवा गटाने प्रवास अशक्य.