-अमर शैला, मुंबईबांद्रा-कुर्ला संकुलात (बीकेसी) डी. वाय. पाटील डिम्ड विद्यापीठाने शैक्षणिक संकुल उभारण्याची तयारी केली आहे. एमएमआरडीएने ८० वर्षांच्या भाडेकराराने शैक्षणिक संस्थेला भूखंड देण्यासाठी निविदा काढली आहे. त्यात डी. वाय. पाटील डिम्ड विद्यापीठाने २२५ कोटींची सर्वाधिक बोली लावली आहे. ही निविदा एमएमआरडीएने खुली केली असून, देशाचे फायनान्शियल हब असलेल्या बीकेसीत आता विद्यापीठाचा कॅम्पसही उभा राहण्याची शक्यता आहे. तसेच सामाजिक सुविधांच्या तीन भूखंडांच्या लिलावातून एमएमआरडीएला ७५९ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
एमएमआरडीएने बीकेसीतील दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यातील केवळ ६ भूखंडांसाठीच कंपन्यांनी निविदा भरल्या. रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि क्लब हाऊस या सामाजिक सुविधांच्या तीन भूखंडांच्या निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या.
या तीन भूखंडांसाठी एमएमआरडीएने ६५५ कोटींचे किमान मूल्य निश्चित केले होते. मात्र कंपन्यांनी १५.९ टक्के अधिक म्हणजेच ७५९ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
भूखंडाचा वापर कशासाठी?
निविदा काढलेल्या तीन सामाजिक वापराच्या भूखंडांमध्ये क्लब हाऊस आणि क्रीडा सुविधांच्या भूखंडाचे क्षेत्रफळ ५२,१३८ चौमी आहे. त्यावर १०,४२७ चौ. मीटर बांधकाम करता येईल. यात क्लब हाऊस, बँक्वेट लॉन, दोन हेलिपॅड, गार्डन, आऊटडोअर स्पोर्टसाठी सुविधा निर्माण करता येतील.
रुग्णालयासाठी १०,०२६ चौरस मीटर भूखंड भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. त्यावर २०,०५२ चौ. मीटर बांधकाम करता येईल. तिसरा भूखंड शिक्षण संस्थेसाठी दिला जाणार आहे. त्याचे क्षेत्रफळ ५११७ चौ. मीटर आहे. त्यावर १०,२३५ चौ. मीटरचे बांधकाम करता येईल.
कोणत्या कंपन्यांनी मारली बाजी? (आकडे कोटींमध्ये)
भूखंड कंपनी नाव राखीव किंमत लावलेली बोली
शिक्षण डी. वाय. पाटील डिम्ड विद्यापीठ १६५ २२५
रुग्णालय ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल ३२२ ३५४
क्लब हाऊस ऑरो रिॲलिटी प्रा. लि. १६८ १८०