धुळीचे वादळ, अवकाळीचा फेरा, मुंबई, ठाणेकर गुदमरले; कल्याण-डोंबिवलीत पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:45 IST2025-04-05T12:45:19+5:302025-04-05T12:45:59+5:30
Dust Storm, Unseasonal Rain In MahaMumbai: राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच शुक्रवारी मुंबई आणि परिसरात धुळीचे लोट आसमंतात पसरले. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या.

धुळीचे वादळ, अवकाळीचा फेरा, मुंबई, ठाणेकर गुदमरले; कल्याण-डोंबिवलीत पाऊस
मुंबई/ठाणे/रायगड - राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच शुक्रवारी मुंबई आणि परिसरात धुळीचे लोट आसमंतात पसरले. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या. या धुळीच्या वादळाचा आणि अवकाळीचा फटका मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, पेण, खोपोली असा सर्वदूरपर्यंत बसला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईसह लगतच्या परिसरात होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम शुक्रवारी दिसून आला. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मुलुंड, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, कर्जत, खोपोली लगतच्या परिसराला वादळी वाऱ्याचा फटका बसला. महामुंबईवर शुक्रवारी सकाळपासून मळभ दाटून आले होते. दुपारनंतर मात्र अचानक वातावरणात बदल होऊन कल्याण, डोंबिवलीसह नवी मुंबई व मुलुंड परिसरात धुळीचे लोट उठले. मुंबईत फोर्ट, महालक्ष्मी, वरळी, दादर, माहीम, बीकेसी, कुर्ल्यासह लगतच्या परिसरात वादळामुळे आसमंतात धुळीचे साम्राज्य होते.
डोंबिवली, उल्हासनगरात पावसाच्या सरी
ठाणेकर शुक्रवार सकाळपासून उकाड्याने हैराण झाले होते. दुपारी ४ च्या सुमारास अचानक अंधार दाटून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागांत धुळीचे लोट हवेत उडू लागल्याने शहरातील टॉवर दिसेनासे झाले. धुळीच्या वादळामुळे ठाणेकर अक्षरश: गुदमरले. डोंबिवली, उल्हासनगर व त्यापुढील भागात पावसाच्या सरी कोसळल्या. वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या. कळवा येथील जुन्या उड्डाणपुलावरील पथदिव्याचा खांब पडला. नौपाडा परिसरात गांधर्वी इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या तीन दुचाकी गाड्यांवर झाड कोसळले.
आटगावजवळ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला पत्रा
मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी दुपारी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये पत्रा अडकला. यामुळे एक लोकल पंधरा मिनिटे तर त्यामागे एक एक्स्प्रेस ८ मिनिटे थांबली. पॉवर ब्लॉक घेऊन हा पत्रा हटविण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
वातावरण बदलाचा परिणाम म्हणून मुंबईच्या हवामानात उलथापालथ होत आहे. शनिवारी मुंबईत उष्ण वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे.
- शुभांगी भुते, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
पालघरमध्ये गारांचा पाऊस
पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. खोडाळा परिसरात दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. अनेक झाडे उन्मळून पडली तसेच अनेक घरांचे पत्रे उडाले. वादळी पावसाने तळ्याचीवाडी येथील शासकीय कन्या वसतिगृहाचे पत्रे उडाले. यावेळी कार्यालयात काम करत असलेल्या अधीक्षिका दुर्गा भामरे यांना दुखापत झाली.
रायगडमध्ये झाडे पडली
रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, खालापूर तालुक्यांना शुक्रवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने झोडपले. तीव्र उन्हामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेकांची अवकाळीमुळे तारांबळ उडाली.
कर्जत, खालापूर तालुक्यात ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.