Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात रेल्वेने पुरविली ५ लाख अन्नाची पाकिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:58 IST

गरजू आणि निराधारांची भूक रेल्वेने मिटवली 

 

मुंबई : लॉकडाऊन काळात एकाच ठिकाणी अडकलेल्या मजुरांना आणि गरजू व्यक्तींना रेल्वेकडून दररोज अन्नदान केले जात आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे विभागाच्यावतीने गरजू आणि निराधार नागरिकांना अन्नदान केले जात आहे. या दोन्ही विभागाच्यावतीने ५ लाख ४ हजार अन्नाची पाकिटे वाटली आहेत. 

पश्चिम रेल्वेद्वारे ‘मिशन फूड डिस्ट्रिब्यूशन’ अभियान २९ मार्चपासून सुरू आहे. २० एप्रिलपर्यंत सुमारे २ लाख ८५ हजार अन्नाची पाकिटे पश्चिम रेल्वे विभागाकडून वाटण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या मुंबई, अहमदाबाद, राजकोट, बडोदा, रतलाम, भावनगर या सहा विभागातील वेगवेगळ्या स्थानकाच्या आसपासच्या परिसरातील गरजु व्यक्तींना अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत.  लॉकडाऊन काळात मध्य रेल्वे प्रशासनाने सुमारे २ लाख १९ हजार अन्नाची पाकिटे वाटली. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर, नागपूर येथील पाच विभागात गरजू आणि निराधार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली.

पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या या कामाला आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल, पुणे आणि अहमदाबाद येथील बेस किचनची मदत मिळाली आहे. आयआरसीटीसीकडून दोन्ही विभागाला ५ लाखांपैकी २ लाख ८६ हजार अन्नाची पाकिटे पुरविण्यात आली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.  अन्नाची पाकिटे वाटण्यासाठी आरपीएफ, रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी मदत करत आहेत. त्यामुळे ५ लाख अन्नाची पाकिटे लॉकडाऊन काळात वाटणे शक्य झाले आहे. 

-------------------------------

 

संपूर्ण देशभरात भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागातून अन्नदान केले जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात देशभरात २० लाख ५ हजार अन्नाची पाकिटे वाटली आहेत. आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल, पुणे, अहमदाबाद, नवी दिल्ली, बंगलोर, हुबळी, भुसावळ, हावडा, पटना, गया, रांची, कटिहार, दिन दयाळ उपाध्ये नगर, बलासोरे, विजयवाडा,खुर्दा, कात्पदी, तीरुचीराप्पाल्ली, धनबाद, गुवाहाटी, समस्तीपुर, प्रयागराज, इटारसी, विशाखापट्टनम, चेन्गाल्पत्तू, हाजिपूर, रायपूर आणि टाटानगर येथील बेस किचनच्या मदतीने रेल्वेने अन्नदान केले असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.  

-------------------------------

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस