गणित परीक्षेत 'डमी' उमेदवार, मोबाइलचाही वापर; दोघांवर गुन्हा, गोराई येथील प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:50 IST2025-12-17T12:49:12+5:302025-12-17T12:50:30+5:30
पोलिस चौकशीत हा विद्यार्थी १४ वर्षीय असून, त्याचे खरे नाव वेगळेच आहे. तो बोरीवलीचा रहिवासी असल्याचे उघड झाले.

गणित परीक्षेत 'डमी' उमेदवार, मोबाइलचाही वापर; दोघांवर गुन्हा, गोराई येथील प्रकार उघड
मुंबई : गणित अध्यापक मंडळाच्या गणित प्रभुत्व परीक्षेदरम्यान एका अल्पवयीन विद्यार्थ्याने बनावट नावाने परीक्षेला बसून मोबाइलद्वारे प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर पाठविल्या. खासगी शिकवणीच्या शिक्षिकेने त्याच्याकडून हा प्रकार करून घेतल्याचा आरोप आहे. बोरीवली पोलिसांनी तिच्यासह दोघांवर १४ डिसेंबरला गुन्हा दाखल केला आहे.
गोराई येथील माध्यमिक शाळेमध्ये १४ डिसेंबरला दुपारी १२ ते २ या वेळेत ही परीक्षा चार केंद्रांवर घेण्यात आली. इयत्ता पाचवी, सातवी व आठवीचे एकूण १३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. केंद्र क्रमांक १३ वर एक परीक्षार्थी वारंवार स्वच्छतागृहात असल्याने जात पर्यवेक्षिकेला संशय आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडे मोबाइल आढळला. मोबाइलच्या पाहणीत दुपारी १२.०१ वाजल्यापासून व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस चौकशीत हा विद्यार्थी १४ वर्षीय असून, त्याचे खरे नाव वेगळेच आहे. तो बोरीवलीचा रहिवासी असल्याचे उघड झाले.
शिक्षिकेने परीक्षेस बसवले
मालाडमधील एका शाळेत तो इयत्ता नववीत शिकत असून, बोरीवलीतील खासगी क्लासमध्ये जात असल्याची माहिती समोर आली. त्या क्लासमधील शिक्षिकेने त्याला बनावट नावाने परीक्षेला बसण्यास सांगितल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.