Amruta Fadnavis: मुंबईतील ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, अमृता फडणवीस यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:35 IST2022-02-04T14:34:33+5:302022-02-04T14:35:12+5:30
Amruta Fadnavis: किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

Amruta Fadnavis: मुंबईतील ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, अमृता फडणवीस यांचा दावा
Amruta Fadnavis: किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. याचबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिलांनी आपल्या देशात आधीच खूप भोगलेले आहे. यामुळे महिलांच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करणे चुकीचे वाटते. त्यापासून दूर राहायला हवं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त वसुली सरकार आहे. जनतेला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे याची काहीच सरकारला पडलेली नाही. जगही बोलू लागलंय की राज्यसरकारकडून दुजाभाव सुरू आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
मुंबईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ३ टक्के घटस्फोट
अमृता फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्याबाबत भाष्य करत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. "तुम्ही हे विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे. जेव्हा मी काही बोलते तेव्हा मी सामान्य स्त्री म्हणून बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा इतर गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. आज मुंबईतील खड्ड्यांमुळे ट्राफिक जाम होतं आणि या ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात. कारण आज मुंबईकरांना कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. यावर जर तुम्ही बोलणार नसाल तर काय कराल", असं अमृता फडणवीस म्हणाल्या.