पावसामुळे भाजीपाला महागला; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:14 IST2025-10-15T10:14:18+5:302025-10-15T10:14:29+5:30
१० रुपयांत कोथिंबिरीच्या दोन कांड्या; मेथीही वरचढ

पावसामुळे भाजीपाला महागला; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सप्टेंबरमधील अवकाळी पावसामुळे राज्यातील भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पालेभाज्या सडल्या, फळभाज्या जमिनीसकट वाहून गेल्या. परिणामी मुंबईतील बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने टंचाई निर्माण झाली असून, दर वाढले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
शेतकऱ्यांचे श्रम गेले पाण्यात
पावसामुळे नाशिक, पुणे, ठाणे, पालघर परिसरातील शेतांमध्ये पाणी तुंबले. मुळे सडल्याने पालेभाज्या आणि फळभाज्या दोन्हींचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे महिनाभराचे श्रम पाण्यात गेले आहेत.
भाजी- फळांची आवक घटली
भाजी मार्केटमध्ये पालेभाज्यांबरोबरच फळांची आवक घटली आहे. त्यामुळे मेथीची किंमत किलोमागे रु.४० ते रु.५०, तर कोथिंबिरीचाही भाव वधारला आहे.
फळभाज्याही शंभरीच्या घरात
वांगी, भेंडी, कारली, तोंडली, दुधी यांसारख्या फळभाज्यांचे दर किलोमागे रु.४० ते रु.८० दरम्यान पोहोचल्याने ग्राहकांना भुर्दंड पडत आहे.
टोमॅटोने पुन्हा खाल्ली उचल
एकेकाळी स्वस्त असलेला टोमॅटो पुन्हा महाग झाला आहे. सध्या त्याचा दर रु. ६० ते रु. ८० किलोपर्यंत गेला आहे. आवक घटल्याने दरात चढ-उतार आहे.
‘दर इतके वाढले की आता पालेभाज्या घ्याव्यात की दिवाळीसाठी गोडधोड करावे हेच कळेनासे झाले आहे.’
- रसिका सावंत, गृहिणी
‘पूरपरिस्थिती आणि सणासुदीचे दिवस असल्याने भाज्यांचे भाव वाढले आहेत. दिवाळीनंतर दर कमी होतील, असे वाटते.’
मयुरेश मोरे,
- भाजी विक्रेते, भायखळा मंडई