माथाडींमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड, दररोज १७ हजार कामगार गाळतात घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 07:04 IST2020-05-23T04:14:29+5:302020-05-23T07:04:52+5:30
लॉकडाउनच्या काळात राज्यातील १२ कोटी जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अभेद्य ठेवणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे कामगार विभागाने सुरुवातीलाच हेरले होते.

माथाडींमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड, दररोज १७ हजार कामगार गाळतात घाम
मुंबई : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, अशा बातम्या अनेकदा कानावर येतात. मात्र, किरकोळ बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र राज्यात कुठेही दिसले नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, गॅस सिलिंडर, औषधे आदी अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची साखळी अखंड ठेवण्याचे शिवधनुष्य राज्याच्या कामगार विभागाने समर्थपणे पेलले आहे. त्यासाठी १६ ते १७ हजार माथाडी कामगार दररोज घाम गाळत आहेत.
लॉकडाउनच्या काळात राज्यातील १२ कोटी जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अभेद्य ठेवणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे कामगार विभागाने सुरुवातीलाच हेरले होते. त्यामुळेच शासकीय धान्य, कृषी उत्पन्न बाजार समित्या, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचे प्रकल्प, औषधे व इतर अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती करणाºया कारखान्यांच्या ठिकाणी कार्यरत माथाडी कामगारांच्या दैनंदिन कामकाजाचे सनियंत्रण कामगार आयुक्त कार्यालयाने आपल्या हाती घेतले होते.
राज्यात १ लाख १५ हजार ९५९ अत्यावश्यक सेवांची दुकाने आणि आस्थापने कार्यरत आहेत. तेथे अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कामगार विभाग कसोशीने प्रयत्न करत असल्याची माहिती कामगार विभागाचे सहआयुक्त रविराज इळवे यांनी दिली. या कामात अनेक छोटे-मोठे अडथळे आले. मात्र, समन्वयाने मार्ग काढण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
कामगार विभाग आणिमाथाडींचा समन्वय कामगार विभाग पुरवठा साखळी अभेद्य ठेवण्यासाठी दैनंदिन सनियंत्रण ठेवत आहे. राज्यातील ९४६ धान्य गोदामांमध्ये आवश्यक धान्याची चढाई-उतराई (चार हजार), २९५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाला व फळांची उतराई (पाच हजार), गॅस सिलिंडर व अत्यावश्यक उत्पादनाची निर्मिती करणाºया सुमारे २५६५ कारखान्यांमध्ये (आठ हजार) अशा जवळपास १६ ते १७ हजार माथाडी कामगारांमुळे ही पुरवठा साखळी अखंड सुरू राहिली.
रेल्वेच्या मदतीलाही धाव
अन्नधान्य, खते, साखर, सिमेंट आदी वस्तूंचा पुरवठा करणाºया रेल्वेच्या मालगाड्या राज्यात अनेक ठिकाणी अनलोडिंगची सुविधा नसल्याने अडकून पडल्या होत्या. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला त्यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कामगार विभाग त्यांच्या मदतीला धावून गेला. गेल्या दोन महिन्यांत ७५ मालगाड्यांमधील वस्तूंचे अनलोडिंग माथाडी कामगारांच्या मदतीने पूर्ण केले आहे.