मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेचे तीन-तेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 03:06 AM2019-08-04T03:06:03+5:302019-08-04T03:08:11+5:30

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा अनुभव लक्षात घेऊन कुर्ला-सायन दरम्यान थांबविली लोकल

Due to heavy rains | मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेचे तीन-तेरा

मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेचे तीन-तेरा

Next

मुंबई : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान गुडघाभर पाणी साचले. मात्र, खबरदारी म्हणून दोन्ही दिशेकडील लोकलसेवा दुपारी काही काळ स्थगित करण्यात आली होती.
नुकताच बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्यात अडकल्याने तब्बल १ हजार प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे यावरून धडा घेत शनिवारी मध्य रेल्वेने मुसळधार पावसात लोकलसेवा काही काळ बंद केली.
कुर्ला, ठाणे स्थानकावर शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. कुठलीच माहिती मिळत नसल्याने प्रवासी संतप्त झाले होते. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने कुर्ला ते सायनदरम्यान पाणी साचल्याची, तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्याची उद्घोषणा केली.

प्रवासी उतरले रेल्वे रुळावर
घाटकोपर-विद्याविहार स्थानकांदरम्यान लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून सायन स्थानक गाठले. त्यामुळे प्रवाशांनी विद्याविहार ते सायन रेल्वेमार्गावर गुडघाभर साचलेल्या पाण्यातून प्रवास केला.
रेल्वे प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ आली धावून
मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी तुंबल्याचा फटका बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनाही बसला. १७ बसगाड्या पाणी तुंबल्यामुळे तर ३१ बसगाड्या तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्या होत्या. तरीही मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाल्यामुळे रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ धावून आली. बेस्टने या काळात २६२४ बसगाड्यांव्यतिरिक्त सीएसटी ते मुलुंड आणि वाशीदरम्यान ६१ जादा बसगाड्या चालविल्या. याचा मोठा दिलासा रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना मिळाला. सीएसटीहून मुलुंड व वाशीसाठी ६१ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे साईनाथ सबवे, दहिसर सब वे, ओबेरॉय जंक्शन, दत्त मंदिर रोड कांदिवली, बाबरेकर नगर, कांदिवली (पश्चिम), गांधी मार्केट सर्कल, हिंदमाता या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग अन्यत्र वळविण्यात आले.

ठाणे-सीएसएमटी-कल्याण वाहतुकीवर परिणाम
ठाणे : मध्य रेल्वेवरील रुळांचा पावसाच्या पाण्याने ताबा घेतल्याने दुपारी तब्बल तीन तास ठाणे-सीएमएसटी लोकल वाहतूक ठप्प होती. त्याचा परिणाम ठाणे-कल्याण या अप व डाउन मार्गावरील वाहतुकीवर झाला. यामुळे शनिवारी दुपारी डोंबिवली ते ठाणे या १५-२० मिनिटांच्या प्रवासाला तब्बल दोन ते अडीच तास, तर दिवा ते ठाणे या १० ते १५ मिनिटांच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यातच, कल्याणकडून येणाऱ्या लोकल पुन्हा कल्याण दिशेकडे वळवल्याने लोकलमध्ये उतरणाºया व चढणाऱ्यांची गर्दी पाहण्यास मिळाली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने कल्याण दिशेकडे तब्बल १० विशेष गाड्या सोडल्या, तर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुर्ला आणि ८ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी लोकल सोडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
पुणे-मुंबई इंटरसिटी, इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द
पुणे-मुंबई इंटरसिटी, पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस ३ आॅगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर नाशिक रोडपर्यंत चालविण्यात येईल. शनिवारी मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे चेन्नई एक्सप्रेस विद्याविहार आणि कुर्ला स्थानकादरम्यान थांबून होती. तर मध्य रेल्वेच्या धीम्या तसेच जलद मार्गावर अनेक मेल, एक्स्प्रेस एकामागून एक खोळंबल्या होत्या.

मोनोरेल तांत्रिक कारणास्त ठप्प; प्रवाशांचे हाल
मुसळधार पावसाचा फटका मोनोरेलाही बसला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास तांत्रिक कारणास्तव वडाळा स्थानका जवळ मोनो बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वडाळा ते चेंबूर या पहिल्या आणि वडाळा ते जेकब सर्कल या दुसºया टप्प्यावर मोनो धावते, मात्र शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मोनोरेलच्या वडाळा स्थानकाजवळ तांत्रिक कारणास्तव मोनो बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मोनो रेल्वेची दुरुस्ती करून रविवारी सकाळपासून मोनोची सेवा पूर्ववत होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (एमएमआरडीए) सांगण्यात आले.

पंप ठरले कुचकामी
सायन, कुर्ला, चुनाभट्टी या सखल भागांत रेल्वेमार्गावर पंपांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सायन स्थानकावर पाणी साचले असतानादेखील पंप बंद होते. त्यामुळे पंपावर खर्च करून पंप कुचकामी ठरल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
लोकल बंद, मात्र तिकीट विक्री सुरू
कुर्ला स्थानकावर तब्बल अडीच तास लोकल सेवा बंद होती. लोकल बंद असूनदेखील तिकीट खिडक्यांवर तिकीट विक्री सुरू होती. तिकीट काढत असलेल्या प्रवाशांना लोकल बंद असल्याची कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांचा वेळ आणि तिकिटांचे पैसे वाया गेले, अशी प्रतिक्रिया प्रवासी इब्राम खान यांनी दिली.
आजचा मेगाब्लॉक रद्द
मध्य रेल्वे मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी मुसळधार पाऊस पडला होता. पावसाने लोकलसेवेला फटका बसल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे रविवारी मेगाब्लॉक रद्द करून प्रवाशांना योग्य सुविधा देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. रविवारी हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमध्ये कोणताही बदल केला नाही.

Web Title: Due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस