Mumbai Crime: पुण्याच्या कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल अपघाताची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना मुंबईच्या साकीनाका परिसरात घडली आहे. दुबईवरून ईद साजरा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १५ वर्षीय प्रतीक माने या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ८:३० च्या सुमारास प्रतीक सुभाष माने (१५) आणि त्याचा चुलत भाऊ सुमित गणेश ढवळे (२२) हे दोघे दुचाकीवरून जेवणाचे पार्सल आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. अमृत शक्ती रोड परिसरातून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सुमितचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि प्रतीक रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघात करून पळ काढला, कुटुंबाने पोलिसांची दिशाभूल केली
अपघातानंतर अल्पवयीन कार चालकाने मदतीऐवजी गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला. साकीनाका पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपीच्या कुटुंबाने तो मीरा रोडला गेल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच आरोपीला चांदीवलीतील एका नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेतले.
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यावरही गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी केवळ अल्पवयीन मुलालाच नाही, तर त्याच्यासोबत कारमध्ये असलेल्या मोहम्मद अनस खान (२२) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद हा एमबीबीएसचा विद्यार्थी असून त्यानेच ती कार भाड्याने घेतली होती आणि अल्पवयीन मुलाला चालवण्यास दिली होती.
१७ वर्षांचा मुलगा दुबईचा रहिवासी असून सुट्ट्यांसाठी मुंबईत आला होता. तर मृत प्रतीक माने याचे वडील रिक्षाचालक असून आई घरकाम करते. अल्पवयीन मुलाची २७ मार्चपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीच्या नंबर प्लेटचे काही अंक दिसले होते, त्यावरून पोलिसांनी भाड्याने कार देणाऱ्या एजन्सीचा शोध लावला.
स्थानिक नागरिकांचा संताप
चांदीवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणाऱ्या पालकांवर आणि गाडी मालकांवर कडक कारवाई व्हायला हवी. याआधीही या भागात अशा घटना घडल्या आहेत, पण ठोस कारवाई होत नसल्याने सातत्याने अशा घटना होत आहेत," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Web Summary : A Dubai-returned minor fatally struck a student in Mumbai's Sakinaka. The 15-year-old victim died, his cousin injured. Police arrested the teen and charged an MBBS student who provided the car. Locals demand stricter action.
Web Summary : दुबई से लौटे एक नाबालिग ने मुंबई के साकीनाका में एक छात्र को कुचल दिया। 15 वर्षीय पीड़ित की मौत हो गई, उसका चचेरा भाई घायल हो गया। पुलिस ने किशोर को गिरफ्तार कर लिया और एमबीबीएस के एक छात्र पर भी आरोप लगाया जिसने कार दी थी। स्थानीय लोगों ने सख्त कार्रवाई की मांग की।