Join us

मद्यधुंद टेम्पो चालकाची धडक अन् बसने ७ जणांना चिरडले, एक जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:30 IST

या धडकेत बेस्टचा टायर फुटल्याने बेस्ट बसने रस्त्यावरील पादचारी, प्रवाशांना चिरडले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दादरमध्ये रविवारी रात्री उशिराने मद्यधुंद अवस्थेत भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन निघालेल्या चालकाने बेस्ट बसला धडक देत पुढे टॅक्सीला धडकला. टॅक्सी पुढे उभ्या कारवर आदळली तर या धडकेत बेस्टचा टायर फुटल्याने बेस्ट बसने रस्त्यावरील पादचारी, प्रवाशांना चिरडले. या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एकाच कुटुंबातील तिघांसह सहा जण जखमी झाले. शिवाजी पार्क पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालक संजय धोंडू कुंभार (२७) याला अटक केली आहे. 

अपघातात शहाबुद्दिन जैनुलाब्दीन शेख (३५) याचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल अशोक पाडाळे (३०), अक्षय अशोक पाडाळे (२५), रोहित अशोक पाडाळे (३३), विद्या राहुल मोटे (२८), अभिषेक राऊतकर (२४), अब्दुल नादीर  (२३) जखमी झाले आहे. सर्व जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. -शिवाजी पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एन. सी. केळकर रोडवर हुतात्मा भाई कोतवाल बेस्ट बसथांब्यावर हा अपघात घडला. पोलिस शिपाई महादेव शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा नोंदवला. 

वडाळा परिसरात राहणारा संजय हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात टेम्पो ट्रॅव्हलरने शिवाजी पार्कच्या दिशेने येत असताना त्याने प्लाझा बसथांब्याकडे येणाऱ्या १६९ बेस्ट बसला उजव्या बाजूने धडक देत उभ्या टॅक्सीला धडकला. टॅक्सी पुढे उभ्या कारवर आदळली. एक टायर फुटल्याने बस अनियंत्रित होत रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत पुढे थांब्याजवळ धडकली. काही प्रवासी व पादचारी थांब्याच्या फुटपाथवर फेकले गेले. या अपघातात सहाजण जखमी झाले तर, शेखचा जागीच मृत्यू झाला. मृत शेख हा वडाळा अँटॉपहिल येथील रहिवासी होता. तो फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करायचा. तर जखमीपैकी पाडाळे कुटुंब आणि अभिषेक, विद्या हे प्रतीक्षा नगर येथील रहिवासी आहेत. तर नादीर हा वडाळा शांतीनगर परिसरात राहतो.

बस तपासणीसाठी आरटीओमध्ये : पोलिसांनी संबंधित  बस सोडवून वडाळा आगारात आरटीओ तपासासाठी ठेवली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीत बेस्टचे अपघात अधिकारी पोंदे, तसेच भाडेतत्त्वावरील (मातेश्वरी) कंपनीचे अपघात निरीक्षक शिरसाट आणि निरीक्षक चास्कर हे घटनास्थळी उपस्थित होते.

...तर अपघाताचे स्वरूप आणखी भीषण असतेअपघात झालेला परिसर नेहमीच गजबजलेला असतो. सुदैवाने ही घटना रात्री उशिराने घडली. अन्यथा या अपघाताचे स्वरूप आणखीन भीषण असते. रात्री दहा वाजेपर्यंत येथील दुकाने बंद होतात. आम्हीही साडेदहापर्यंत सर्व बंद करून निघालो. त्यामुळे आम्हीही त्यातून थोडक्यात बचावल्याचे बसथांब्याजवळील रस्त्यावर दुकान लावणाऱ्या व्यापाऱ्यांनी म्हटले. 

मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यातसायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, चार रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. मृत व्यक्तीची शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.  चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध दारूच्या नशेत बेदरकारपणे, भरधाव वेगाने वाहन चालवून एकाच्या मृत्यूस तसेच ६ जणांना जखमी होण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. - विलास दातिर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलिस ठाणे

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Tempo Driver Hits Bus, Kills One, Injures Six

Web Summary : A drunk tempo driver in Dadar crashed into a bus, leading to a fatal accident. One person died, and six others were injured after the bus hit pedestrians. The driver has been arrested. Injured are receiving treatment at Sion Hospital.
टॅग्स :अपघातदादर स्थानक