मद्यधुंद चालक कारसह कोस्टल रोडवरून समुद्रात; जवानांनी लगेच धाव घेतल्याने तरुण सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:44 IST2025-10-08T09:44:38+5:302025-10-08T09:44:48+5:30
वरळी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार मुशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बत्तीवाला हा कारने ताडदेव येथून कोस्टल रोडने वांद्रेच्या दिशेला निघाला.

मद्यधुंद चालक कारसह कोस्टल रोडवरून समुद्रात; जवानांनी लगेच धाव घेतल्याने तरुण सुखरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दारूच्या नशेत कोस्टल रोडने वांद्रेच्या दिशेने भरधाव निघालेला तरुण थेट रेलिंग तोडून कारसह समुद्रात कोसळल्याची घटना घडली. घटनेनंतर तेथे तैनात जवानांनी तत्काळ बचावकार्य राबवत तरुणाला सुखरूप बाहेर काढले. फ्रशोगर दरायूश बत्तीवाला (२९) असे चालकाचे नाव असून, वरळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दारूच्या नशेत निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
वरळी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार मुशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बत्तीवाला हा कारने ताडदेव येथून कोस्टल रोडने वांद्रेच्या दिशेला निघाला.
नमन झाना बिल्डिंगच्या विरुद्ध दिशेला कोस्टल रोड नाॅर्थ बाॅन्डवर बिंदुमाधव ठाकरे चौक व प्रभादेवीला जाण्यासाठी उतरणाऱ्या ब्रिजजवळ मद्यधुंद चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट रेलिंग तोडून समुद्रात कोसळली. गस्तीवर असलेले पोलिस आणि जवानांनी तत्काळ बचावकार्य करत दोरीच्या साह्याने चालकाला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात नेले.
कारचा लागला शोध
कारचा शोध लागला असून ती समुद्रातून बाहेर काढण्यात येत आहे. सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घातला तसेच रेलिंग तोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.