मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:53 IST2025-10-23T10:51:57+5:302025-10-23T10:53:18+5:30
कस्टम्स विभागाने तत्काळ कारवाई करत तिन्ही प्रवाशांना 'नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८५'अंतर्गत अटक केली आहे.

मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा एकदा ड्रग्ज तस्करांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. मुंबई कस्टम्सच्या झोन-३ विभागाने २० आणि २१ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवाया करत तब्बल १९.७८ कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य असलेले 'हायड्रोपोनिक वीड' जप्त केले आहे. याप्रकरणी तीन आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
हाँगकाँग ते मुंबई; बॅगमध्ये लपवले होते ड्रग्ज
विमानतळातून गांजासारख्या या अंमली पदार्थाची तस्करी करण्याचे प्रकार वाढू लागले असतानाच, कस्टम्स अधिकारी अत्यंत सतर्क झाले आहेत. पहिल्या प्रकरणात, गुप्त माहितीच्या आधारे कस्टम्स अधिकाऱ्यांनी हाँगकाँगहून मुंबईला आलेल्या 'सीएक्स ६६३' विमानातील दोन प्रवाशांना रोखले. या प्रवाशांच्या चेक-इन ट्रॉली बॅगेची कसून तपासणी केली असता, बॅगच्या आत गुप्तरित्या लपवलेले ७.८ किलोग्राम 'हायड्रोपोनिक वीड' जप्त करण्यात आले. याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे.
बँकॉक कनेक्शन उघड! ११ कोटींचे ड्रग्ज पकडले
दुसरा गुन्हाही एका गुप्त माहितीच्या आधारे उघडकीस आला. बँकॉकहून मुंबईत आलेल्या '६ ई-१०५२' विमानातील एका प्रवाशाला कस्टम्स अधिकाऱ्यांनी थांबवले. त्याच्या चेक-इन बॅगेची तपासणी केली असता ११.९ किलोग्राम 'हायड्रोपोनिक वीड'चा साठा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १२ कोटी रुपये आहे.
एनडीपीएस कायद्यांतर्गत तिघांना अटक
कस्टम्स विभागाने तत्काळ कारवाई करत तिन्ही प्रवाशांना 'नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८५'अंतर्गत अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत अंमली पदार्थ तस्करांकडून मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि इतर मोठ्या शहरांतील विमानतळांचा वापर करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. मात्र, कस्टम्स अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. सप्लाय चेनचा शोधमुंबई कस्टम्स झोन-३ने सांगितले की, दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांची 'सप्लाय चेन' आणि यामागील मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क शोधण्याचे आव्हान सध्या अधिकाऱ्यांपुढे आहे.