कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:53 IST2025-10-24T08:24:08+5:302025-10-24T08:53:52+5:30
Mumbai Crime News: अमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली.

कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
Salim Dola drugs case: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. हे संपूर्ण रॅकेट थेट दुबईतून चालवले जात होते. कुख्यात डी-गँगच्या ड्रग्स नेटवर्कशी जोडलेला आणि मुख्य ड्रग्स तस्कर सलीम डोळाचा निकटवर्तीय असलेला आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याला दुबईतून अटक करून भारतात आणले आहे. या संपूर्ण कारवाईत तब्बल २५६ कोटींहून अधिक किमतीचा माल आणि १२६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
कुर्ला ते दुबई, तपास कसा झाला?
कुर्ला येथून या प्रकरणाची सुरुवात झाली फेब्रुवारी २०२५ मध्ये क्राईम ब्रँचच्या युनिट-७ ने कुर्ला परिसरातून परवीन बानो गुलाम शेख नावाच्या एका महिलेला ६४१ ग्रॅम मेफेड्रोन आणि १२.२० लाख रोख रकमेसह अटक केली. परवीनच्या चौकशीत महिलेने सांगितले की, तिला हे ड्रग्स मिरा रोड येथील साजिद शेख उर्फ डैब्ज याच्याकडून मिळाले. पोलिसांनी साजिदला अटक केल्यानंतर त्याच्या घरातून सुमारे ६ कोटी किमतीचे ३ किलो एमडी ड्रग्स जप्त केले. साजिदच्या चौकशीतून या नेटवर्कचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. मोहम्मद सलीम सुहैल शेख हा दुबईतून संपूर्ण ड्रग्स नेटवर्क ऑपरेट करत असल्याचे उघड झाले.
सांगलीत 'ड्रग्स फॅक्टरी' उद्ध्वस्त
तपास सुरु असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या टोळीचा मेफेड्रोन पुरवठा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इरली गावातून होत होता. पोलिसांनी २८ मार्च रोजी सांगलीतील या अवैध फॅक्टरीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १२२.५ किलो मेफेड्रोन (किंमत सुमारे २४५ कोटी), ड्रग्स निर्मितीचे साहित्य आणि एक वाहन जप्त करण्यात आले. फॅक्टरीतून ६ आरोपींना जागीच अटक करण्यात आली. पोलिसांना संशय होता की या फॅक्टरीसाठी लागणारा कच्चा माल संयुक्त अरब अमिरातीमधील एका केमिकल कंपनीतून मागवला जात होता.
मास्टरमाइंडला दुबईतून अटक
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम शेख दुबईत लपून बसला होता. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर यूएई पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून भारतात आणण्यात आले. २२ ऑक्टोबर रोजी मुंबई क्राईम ब्रँचने त्याला औपचारिकरीत्या अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत २५६ कोटींहून अधिक असून, यात १२६ किलो मेफेड्रोन, ४.१९ कोटी रोख रक्कम आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीच्या रॅकेटसाठी मोठा झटका मानला जात आहे.