अंधेरी ते वांद्रे या १२ किलोमीटरच्या प्रवासासाठी एका रिक्षाचालकाने प्रवाशाकडून ९० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी सदर रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमूल्य शर्मा असे फिर्यादी तरुणाचे नाव असून तो मूळचा पंजाब येथील रहिवासी आहे. अमूल्य मुंबईतील वांद्रे परिसरात वास्तव्यास असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. दरम्यान, ९ एप्रिल रोजी अमूल्य त्याच्या मित्रासोबत अंधेरीत पार्टी करायला गेला. रात्रभर पार्टी केल्यावर १० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याने वांद्रे येथील आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. मुंबईत नवीन असल्याने त्याला रस्ते फारसे माहिती नाहीत, त्याचाच रिक्षाचालकाने गैरफायदा घेतला.
वांद्रे येथे पोहोचल्यानंतर रिक्षाचालकाने अमूल्यकडे १५०० रुपयांची मागणी केली. पंरतु, अमूल्यने त्याला इतके भाडे देण्यास नकार दिला. परंतु, रिक्षाचालकाने वाद घालायला सुरुवात केल्याने अमूल्यने त्याला १५०० रुपये देण्याचे मान्य केले. पण इतकी रोख रक्कम त्याच्याकडे नव्हती. यामुळे अमूल्यने त्याला ऑनलाईन पैसे पाठवण्याचे ठरवले. अमूल्य त्याचा चष्मा पार्टीतच विसरला. चष्म्याशिवाय त्याला धुरकट दिसते. त्यामुळे अमूल्यने त्याचा मोबाईल रिक्षाचालकाकडे दिला आणि त्याला १५०० रुपये ट्रान्सफर करायला सांगितले. पण रिक्षा चालकाने १५०० ऐवजी थेट ९० हजार रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. हा प्रकार अमूल्यच्या लक्षात येताच त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात आरोपी रिक्षाचालकाविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली.