'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:58 IST2025-11-09T12:51:19+5:302025-11-09T12:58:05+5:30
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर ड्रोन उडवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
Uddhav Thackeray Matoshree: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर ड्रोनने नजर ठेवली जात असल्याच्या आरोप करण्यात आला आहे. मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा व्हिडिओ शूट केला. त्यामुळे मातोश्री वरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले. निवडणुकीच्या काळात मातोश्रीवर टेहाळणी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. मात्र मुंबई पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोन व्हिडिओ ड्रोन उडत असल्याचा पाहिल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याचा व्हिडिओ काढला. मुंबईत ड्रोन उडवण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात. कोणीही परवानगीशिवाय ड्रोन उडवू शकत नाही. त्यामुळे हा ड्रोन कोण उडवत होता याची माहिती सुरुवातीला मिळू शकली नाही. मात्र मातोश्रीच्या बाहेर हा ड्रोन उडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. या घटनेवरून राजकारण तापलं असून आता मुंबई पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
या घटनेचा व्हिडीओ ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केला. "ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या 'मातोश्री' निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?," असा सवाल अंबादास दानवेंनी केला.
ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या 'मातोश्री' निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?… pic.twitter.com/l3YV9OOSyT
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 9, 2025
मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
एमएमआरडीएच्या परवानगीनेच हा ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. एमएमआरडीएचे सर्वेक्षण सुरू होतं त्यामुळे हा ड्रोन उडवण्यात आला असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. एमएमआरडीएकडून या परिसरात कामे सुरू आहेत आणि त्या संदर्भातच या ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येत होती. यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती असे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे.