गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 08:17 IST2025-06-08T08:14:31+5:302025-06-08T08:17:46+5:30
Mumbai Crime News: गृहप्रकल्पाच्या प्रमोशनसाठी परवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार अंधेरी पूर्व भागात घडला. याप्रकरणी मोहम्मद हर्षद अन्सारी, स्वप्निल देसाई आणि सोनू कुमार रॉय या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले.

गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
मुंबई - गृहप्रकल्पाच्या प्रमोशनसाठी परवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार अंधेरी पूर्व भागात घडला. याप्रकरणी मोहम्मद हर्षद अन्सारी, स्वप्निल देसाई आणि सोनू कुमार रॉय या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले.
एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले राजू इटकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. इटकर शुक्रवारी दुपारी गस्तीवर असताना सिप्झ कंपनीतील सुरक्षारक्षक हेमंत कुमार यांनी त्यांना फोनद्वारे त्या परिसरात ड्रोन उडत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी शोध घेताच अन्सारी, देसाई आणि रॉय हे ड्रोन उडविताना सापडले.
अन्सारीने चौकशीत आपण सायनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कर्मचारी असून, कंपनीला एलेगंट बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स कंपनीने कंत्राट दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. युनिकॉन रियालिटी कंपनीला त्यांच्या साइटच्या प्रमोशनकरिता व्हिडीओ करण्याचे काम एलेगंट बिल्डर्सने दिले होते. त्यानुसार युनिकॉन कंपनीचे कर्मचारी देसाई आणि रॉय हे ड्रोन उडविताना प्रकल्प स्थळ दाखविण्यासाठी तेथे उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर बीएनएस कायद्याचे कलम २२३, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
आदेशाचे उल्लंघन, गुन्हा दाखल
पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ५ जून ते ४ जुलै २०२५ दरम्यान ड्रोन रिमोट कंट्रोल मार्को लाईट एअरक्राफ्ट पॅराग्लाइडर्स आणि हँड ग्राइंडर्स उडविण्यास प्रतिबंध आहे. या आदेशाची प्रत एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील महत्त्वाचे चौक, स्थळांवर चिटकवून जनजागृती केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन झाल्याने ड्रोन उडविणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा नोंदविल्याचे ते म्हणाले.