मनोहर कुंभेजकरमुंबई :
बस थांब्यावर होणाऱ्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी त्या परिसरात रस्त्यावर बसलेले अनधिकृत फेरीवाले, दुतर्फा अनधिकृत पार्किंग आणि कट मारून सुसाट जाणाऱ्या रिक्षा व दुचाकी, ठिकठिकाणी खोदलेले रस्ते यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची दैनावस्था झाली आहे. यातून वाट काढत बस चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच असल्याचे बेस्टच्या अनेक चालक व वाहकांनी ‘लोकमत’ला सांगितले. कुर्लाबेस्ट बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर मालाडमधील चालक-वाहकांनी या प्रतिक्रिया नोंदवल्या.
मालाड पूर्वेकडील कुरार, आप्पा पाडा आणि अन्य अरूंद रस्यावर यापूर्वी मिनी बस सोडण्यात येत असत. पण आता त्या बेस्ट प्रशासनाने बंद केल्या असून, या अरूंद रस्त्यावर मोठ्या बस चालवाव्या लागतात. अनेकदा येथे अशी परिस्थिती असते की या रस्त्यांवर बस चालवता येतील का, असा प्रश्न पडतो, अशी खंतही बेस्ट चालकांनी व्यक्त केली.
याबाबत उपाययोजना झाली नाही आणि रस्त्यांची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर भविष्यात मुंबईच्या रस्त्यावरून बेस्ट बस चालवणे अशक्य होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच याकडे बेस्ट प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालायला हवे आणि संबंधित शासकीय विभागांशी या परिस्थितीबाबत सूचित करायला हवे, अशी अपेक्षाही बेस्ट चालकांनी केली आहे.