अत्यावश्यक सेवासाठी राज्यभरातून चालक आणि एसटी बस मुंबई ठाणे, पालघर येथे दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:23 PM2020-05-17T20:23:27+5:302020-05-17T20:24:05+5:30

एसटी महामंडळाकडून आदेश : सुमारे ९७५ बस आणि १ हजार २५० चालक दाखल होतील 

Drivers and ST buses from all over the state will arrive at Mumbai Thane, Palghar for essential services | अत्यावश्यक सेवासाठी राज्यभरातून चालक आणि एसटी बस मुंबई ठाणे, पालघर येथे दाखल होणार

अत्यावश्यक सेवासाठी राज्यभरातून चालक आणि एसटी बस मुंबई ठाणे, पालघर येथे दाखल होणार

Next

 

मुंबई : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून बस चालविण्यात येत आहेत. मात्र हि सेवा अपुरी पडत आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरवणाऱ्या एसटीला मुंबई विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आता राज्यभरातून सुमारे ९७५ एसटी बस आणि १ हजार २५० चालक मुंबई, पालघर, ठाणे येथे दाखल होण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे ने-आण करण्यासाठी एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरु आहे. सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेरी करुन १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यात येत आहे. त्यासाठी दररोज ४०० एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी, पर्यवेक्षक व अधिकारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत. या कामगिरीबरोबरच परदेशातून व देशातील विविध राज्यातून विमान व रेल्वेद्वारे येत असलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. परंतु कर्मचारी वर्गाच्या कमतरतेमुळे एसटीच्या दळणवळण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील एसटी विभागातून ५० ते १०० चालक आणि बस मुंबई, पालघर, ठाणे येथे दाखल करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. 

धुळे विभागातून १५० एसटी बससह चालक; नाशिक, सांगली, सोलापूर, अहमदनगर  या प्रत्येक विभागातून प्रत्येकी १०० एसटी बससह चालक; सातारा या विभागातून ७५ एसटी बससह चालक; बीड, रत्नागिरी, रायगड औरंगाबाद, कोल्हापूर,  उस्मानाबाद, जालना या प्रत्येक  विभागातून प्रत्येकी ५० एसटी बससह चालक असे एकूण ९७५ चालक आणि एसटी बस मुंबई, पालघर, ठाणे या विभागातर दाखल होणार आहेत. तर, औरंगाबाद विभागातून १०० चालक, सातारा विभागातून ७५ चालक आणि बीड, जळगाव या विभागातून प्रत्येकी ५० चालक असे एकूण २७५ चालक दाखल होणार आहेत.

---------------------------------

राज्यभरातून चालक मुंबई, पालघर, ठाणे येथे दाखल होताना एका बसमध्ये २२ चालकाच्या गटाने प्रवास करावा. ज्या विभागातून फक्त चालक येणार आहेत, अशा चालकांसाठी मुंबई, पालघर, ठाणे येथून बस सोडाव्यात. प्रत्येक बस स्वच्छ, सुस्थितीत आणि निर्जंतुकीकरण केलेली असावी, असा सूचना एसटी महामंडळाकडून राज्यातील एसटी विभागाला देण्यात आल्या आहेत. 

---------------------------------

 

  

Web Title: Drivers and ST buses from all over the state will arrive at Mumbai Thane, Palghar for essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.