तस्करीचे सोने वितळवणारा मुंबईतील कारखाना डीआरआयने केला उद्ध्वस्त, ११ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:57 IST2025-11-13T12:56:34+5:302025-11-13T12:57:03+5:30
Crime News: तस्करीद्वारे देशात आलेले सोन्याचे बार आणि सोन्याची पावडर वितळवून त्यातून पुन्हा नवे सोने निर्माण करून ते सोनाराला विकणारा कारखाना केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केला.

तस्करीचे सोने वितळवणारा मुंबईतील कारखाना डीआरआयने केला उद्ध्वस्त, ११ जणांना अटक
मुंबई - तस्करीद्वारे देशात आलेले सोन्याचे बार आणि सोन्याची पावडर वितळवून त्यातून पुन्हा नवे सोने निर्माण करून ते सोनाराला विकणारा कारखाना केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केला. या प्रकरणी चार ठिकाणी छापेमारी करून ११ जणांना अटक करीत १५ कोटींचे सोनेही जप्त केले आहे. तस्करीचे सोने वितळवून त्याची विक्री केली जात असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईतील संबंधित कारखान्यावर छापेमारी केली.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सोने वितळवणाऱ्या विजेवर चालणाऱ्या भट्ट्या तसेच नंतर त्याचे बार करण्यासाठीचे वापरले जाणारे अत्याधुनिक साहित्य जप्त केले आहे. आणखी कुठे असे कारखाने आहेत याचा शोध सुरू आहे.
६ किलो सोने केले जप्त
या छाप्यादरम्यान ६ किलो ३५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तसेच, या कारवाईत अटक केलेल्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली.
सूत्रधाराने तस्करीचे सोने खरेदी करणाऱ्या दुकानदाराची माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकत तेथून ५ किलो ५३ ग्रॅम सोने असे एकूण ११ किलो ८८ ग्रॅम सोने जप्त केले. त्याची किंमत १५ कोटी ५ लाख रुपये आहे. त्याच वेळी १३ लाख १७ हजार रुपयांची ८ किलो ७२ ग्रॅमची अवैध चांदीही जप्त करण्यात आली.