नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंचे धक्कातंत्र : राजीनामा नामंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:29 IST2025-03-18T12:28:10+5:302025-03-18T12:29:32+5:30

माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात सोमवारी नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष प्रशांत दामले यांनी राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला.

Drama Council President Prashant Damle's shock tactics: Resignation rejected | नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंचे धक्कातंत्र : राजीनामा नामंजूर

नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंचे धक्कातंत्र : राजीनामा नामंजूर

मुंबई : नवीन कार्यकारिणी नियुक्त झाल्यापासून झपाट्याने कामे पूर्ण करण्याचा धडाका लावणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी मंडळाने दामले यांचा राजीनामा नामंजूर केला.

माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात सोमवारी नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष प्रशांत दामले यांनी राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. नियामक मंडळाच्या सदस्यांनी राजीनामा एकमताने नामंजूर करत तुम्हाला आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करू, असे सांगत दामले यांनाच अध्यक्षपदावर कायम राहण्यास सांगितले. याबाबत बोलताना दामले म्हणाले की, नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढल्याने, तसेच आणखी दोन नवीन प्रोजेक्ट येणार असल्याने कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करत मी राजीनामा दिला होता. आता परिषदेचे कामकाज स्थिरस्थावर झाले आहे. सर्व कामे मार्गी लागली आहेत. नाट्य परिषदेची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसली आहे. मी माझी जबाबदारी पूर्ण केली. त्यामुळे आता मला मुक्त करा, असे सांगितले; पण कोणीही ऐकायला तयार नव्हते. अध्यक्षपदावर तुम्हीच राहायला हवे. कामाची विभागणी कशी करता येईल ते पाहू, असे नियामक मंडळाचे सदस्य म्हणाले. परिषदेच्या कामाचा ताण घेऊ नका, पण तुम्ही थांबा, असेही मंडळाने सांगितले.  सर्वांनी राजीनामा नामंजूर केल्याने त्यांच्या इच्छेसमोर माझे काहीच चालू शकले नाही, असेही दामले म्हणाले. 

कामाचा वाढता ताण 
नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढल्याने, तसेच  दोन नवे प्रोजेक्ट येणार असल्याने कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. तो नामंजूर केला. 
प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते

प्रशांत दामले यांनी व्यावसायिक व्यग्रतेमुळे कामकाजासाठी पुरेसा वेळ देऊ शकण्याविषयी साशंकता व्यक्त करत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली; परंतु उपस्थित नियामक मंडळ सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याचा विचार फेटाळला.
अजित भुरे, प्रमुख कार्यवाह, नाट्यपरिषद
 

Web Title: Drama Council President Prashant Damle's shock tactics: Resignation rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.